ठसा – डॉ. मिर्झा रफी अहमद बेग

>> प्रवीण टाके

विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांच्या निधनाने मराठी भाषेची गेली 50 वर्षे सेवा करणाऱया एका निस्सीम कवीने निरोप घेतला. ‘मिर्झा एक्स्प्रेस’ नावाने त्यांचे कार्यक्रम प्रसिद्ध होते. मराठी भाषेवरचे त्यांचे प्रेम व त्यासाठी त्यांनी केलेली 50 वर्षांची सेवा महाराष्ट्र कधी विसरणार नाही. मराठी भाषेसाठी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणाऱया कवी मिर्झा रफी अहमद बेग यांना महाराष्ट्र कायम स्मरणात ठेवेल.

1957 सालचा त्यांचा जन्म. वयाच्या अकराव्या वर्षापासून काव्यलेखनाला सुरुवात करणाऱया डॉ. मिर्झांवर सुप्रसिद्ध कवी देविदास सोटे यांच्या खुमासदार शैलीचा सुरुवातीला प्रभाव होता. 1970 पासून त्यांनी मंचावर कविता सादर करायला सुरुवात केली आणि पुढील 50 वर्षे विदर्भ-मराठवाडय़ातील कवी संमेलनांचे ते केंद्रबिंदू ठरले. ‘मोठा माणूस’, ‘सातवा महिना’, ‘उठ आता गणपत’, ‘जांगडबुत्ता’ या त्यांच्या कविता निखळ आनंद देणाऱया होत्या.

अनेक विद्यापीठांमध्ये त्यांच्या कविता अभ्यासक्रमात आहेत. डॉ. मिर्झांचे सादरीकरण म्हणजे जिवंत संवाद. कार्यक्रमाच्या दुसऱया मिनिटातच ते प्रेक्षकांशी अशी नाळ जोडायचे की पुढील तासभर ते आणि श्रोते असेच वातावरण निर्माण होई. त्यांच्या कविता वऱहाडींच्या गावरान बोलीतून वाहणारी जिवंत अभिव्यक्ती आहेत. शेती, माती, शेतकऱयांची हसतमुख वेदना, राजकारणातील विसंगती, समाजातील विसंगती या साऱया विषयांना ते विनोदाच्या चपखल हाताळणीने फुलवतात.

‘मिर्झायन’पासून ‘मिर्झा एक्स्प्रेस’ आणि ‘जित्थं तित्थं मिर्झा’पर्यंत जवळपास 20 पुस्तकांची त्यांची लांबलचक परंपरा आजही वाचकांच्या ओठांवर घर करून आहे. समाजातील दुःख, दारिद्य, अन्याय, अत्याचार आणि अनाचार पाहून जे मनात येतं ते साध्यासोप्या शब्दांत मांडण्याचे काम त्यांनी आयुष्यभर केले. राज्यस्तरावर अनेक नाटकांमध्ये, चित्रपटांत, सीरियलमध्ये आता हक्काने वऱ्हाडीचा वापर होत आहे. तिच्या समृद्धीचा तेजस्वी आधारस्तंभ म्हणजे डॉ. मिर्झा होय.

महाराष्ट्रात कुठल्याही एका गोष्टीमध्ये काही गडबड झाली, गंमत झाली, अपयश आले, फजिती झाली, पराभव झाला, समस्या आली तर या अनेक शब्दांना एक अर्थाचा शब्द म्हणून ‘जांगडबुत्ता’ झाला असे म्हटले जाते. या शब्दाचे ते जनक आहेत. त्यांचा एक काव्यसंग्रह ‘जांगडबुत्ता’ या नावाने आहे.

विदर्भातील संतशिरोमणी असणारे धनज माणिकवाडा येथील श्री फकीरजी महाराज मंदिराचे ते ट्रस्टी होते. ज्ञानेश्वरीपासून ते ग्रामगीतेपर्यंत अनेक धर्मग्रंथांचे ते गाढे अभ्यासक होते. त्यांच्या कवितेमध्ये धर्मग्रंथाचे दाखले समर्पकपणे वापरले जात होते. त्यांच्या दोन ओळींच्या कविता म्हणजे जनसंवादाचा ‘मास्टर क्लास’आहे. सोपेपणा, गेयता, अचूक संदेश या तिन्हीचे परिपूर्ण मिश्रण म्हटले तर डॉ. मिर्झा यांच्या कविता. स्टँडअप कॉमेडीचे ग्रामीण जनक म्हणावे इतकी सहजता त्यांच्या सादरीकरणात होती. ते नेहमी म्हणायचे की, ‘‘स्टेजवरच एखाद्या वेळेस मला पैगंबरवासी व्हायची संधी मिळावी.’’ आपल्या एका कवितेत त्यांनी लिहून ठेवलंय,

भौतिक अर्थाने माझे अस्तित्व नसेन
प्रतिमेच्या रूपाने मी भिंतीवर बसेन
आसपास तुमच्या कुठेतरी असेन
हाक मारली तर ‘ओ’ देऊन हसेन

हसत हसत प्रबोधन, चिमटीत विनोद, मनात घर करणारी शैली या साऱया गुणांचं एकमेव संमिश्रण म्हणजे ‘मिर्झा एक्स्प्रेस’. मुसलमान असूनसुद्धा मराठीत कविता लिहिण्याबद्दल कोणी त्यांना विचारलं तर ते त्यांच्या कवितेत उत्तर देत…

मुसलमान असून येते मले मराठी
थोपटू नका माही पाठ याच्यासाठी
जो जिथे जन्मला तेच त्याची भाषा
पऱ्हाटीकडून बोंडाचीच करानं आशा

मराठी भाषेवर त्यांचे अतिशय प्रेम होते. मराठी भाषेच्या त्यांच्या अनेक कविता विद्यापीठात अभ्यासाला आहेत. भाषेच्या संदर्भात त्यांची ही कविता खूप बोलकी आहे…

मराठीनेच तुकड्याला तुकडोजी केले…
गाडगेबाबा मराठीतच जन्म घेऊन गेले…
अमृतासंग पैज जिंकते अशी मराठी बोली…
आभाळाची उंची जिला समुद्राची खोली…

मराठी भाषेवर प्रेम करणारे डॉ.मिर्झा रसिक श्रोत्यांच्या कायम हृदयात असतील. त्यांच्या स्मृतींस विनम्र अभिवादन.