
महान फलंदाज आणि समालोचक सुनील गावसकर सहसा कुणाला ‘सुपरहिट’ सर्टिफिकेट देत नाहीत. ते कौतुक करतानाही हेल्मेट घालून करतात, शब्द मोजून बोलतात. पण रांचीच्या मैदानावर विराट कोहलीने केलेला खेळ पाहून त्यांच्या हेल्मेटलाही भगदाड पडलेय आणि गावसकरांच्या मनातला निवाडा थेट बाहेर आलाय, तो म्हणजे ‘वनडे क्रिकेटचा किंग आता विराट कोहलीच!’
रांचीमध्ये 120 चेंडूंमध्ये 135 धावांची वादळी खेळी करत विराटने आपलं 52वं वनडे शतक झळकवलं आणि त्याच क्षणी दिग्गज समालोचक गावसकरांनी हिंदुस्थान नव्हे, तर हिंदुस्थानच्या क्रिकेट इतिहासात नवे पर्व सुरू झाल्याची साद दिली. ‘विराट आज वनडे फॉरमॅटमधला सर्वकालीन महान खेळाडू असल्याचे प्रमाणपत्र दिले.
एक काळ असा होता की, क्रिकेटच्या देवळात एकच मूर्ती होती, ती म्हणजे सचिन तेंडुलकर. 51 शतकांचा सिंहासनासारखा विक्रम म्हणजे जणू एव्हरेस्ट. ‘कोणीच तो एव्हरेस्ट चढू शकणार नाही,’ अशीच भावना होती. पण कोहली ते एव्हरेस्ट नुसता चढला नाही, तर वर जाऊन त्याने झेंडा रोवलाय.
छे! आता टेस्ट नव्हे वन डेच बेस्ट, कसोटी पुनरागमनाच्या चर्चांना विराटकडून पूर्णविराम
गावसकरांनी त्या झेंडय़ाकडे बोट दाखवत म्हटलं, जेव्हा तुम्ही महान सचिन तेंडुलकरांना मागे टाकता, तेव्हा तुम्हाला स्वतःचं स्थान कळतं. तसेच ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटचा कडवा योद्धा, रिकी पॉण्टिंगही मैदानाबाहेर येऊन मान डोलावतोय. मी पाहिलेल्या खेळाडूंमध्ये विराट कोहली वनडेतील सर्वोत्तम फलंदाज आहे, असे तो म्हणतोय. म्हणजे जेव्हा ऑस्ट्रेलियन माणूस तुमची तारीफ करतो, तेव्हा तो फक्त काwतुक करत नाही. तो नोंद करत असतो, असेही गावसकरांनी दाखवून दिले.

























































