
कबड्डीची पंढरी म्हणून ओळख असलेल्या ना.म. जोशी मार्गावरील श्रमिक जिमखान्यावर राष्ट्रीय मिल मजदूर संघ आयोजित गं. द. आंबेकर स्मृती क्रीडा स्पर्धांचा थरार रंगणार आहे. येत्या रविवारी 7 डिसेंबरपासून शूटिंगबॉल स्पर्धेने या महोत्सवाचा प्रारंभ होईल.
राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आणि आमदार सचिन अहिर यांच्या पुढाकाराने सुरू होत असलेल्या या महोत्सवात शूटिंगबॉलमध्ये राज्याभरातील संघांनी आपला सहभाग निश्चित केला आहे. या स्पर्धेपाठोपाठ कबड्डीचीही चढाई पाहायला मिळणार आहे. 9 ते 12 डिसेंबर दरम्यान ही स्पर्धा पुरुषांच्या व्यावसायिक गटात खेळविली जाणार आहे. यात बडोदा बँक, मध्य रेल्वे, भारत पेट्रोलियम, सेंट्रल बँक, मुंबई पोर्ट ट्रस्ट, भारतीय टपाल इत्यादी नामवंत संघ खेळणार आहेत. त्याचबरोबर स्थानिक पुरुष ब गटात विजय बजरंग, शिवशक्ती, गुड मॉर्निंग, अमर हिंद, विजय क्लब दादर, लायन क्लब, बंडय़ा मारुती, श्रीराम इत्यादी संघ नेहमीच्या चमकदार खेळाणे आपले कसब पणाला लावणार आहेत. स्थानिक महिला गटात शिवशक्ती, शिरोडकर, विश्वशांती, गोल्फादेवी, जिजामाता, मुंबई पोलीस, स्वामी समर्थ असे अनेक गाजलेले संघ सहभागी होणार आहेत. त्याचप्रमाणे आयडियल स्पोर्टस् क्लबच्या सहकार्याने पॅरम, बुद्धिबळ स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे.
































































