
एसआयआर आणि मतचोरीच्या आरोपांवरून संसदेत सलग दुसऱ्या दिवशी विरोधी पक्ष आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. विरोधकांनी एसआयआरवर चर्चा करावी, ही मागणी केली. आज लोकसभेचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्षाच्या खासदारांनी घोषणाबाजी सुरू केली. काही जण तर वेलमध्ये पोहोचले. यावेळी त्यांनी “वोट चोर, गद्दी छोड” अशी घोषणाबाजी केली.
विरोधी पक्षाच्या खासदारांच्या घोषणाबाजी सुरू असतानाच लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृह तहकूब केले. दरम्यान, वरिष्ठ सभागृहात एसआयआरबाबत घोषणाबाजी करण्यात आली आणि संचार साथी अॅपचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. गदारोळामुळे राज्यसभेचे कामकाजही तहकूब करण्यात आले.
याआधी विरोधी पक्षाच्या खासदारांनी संसद संकुलातील मकर गेटसमोर सकाळी १०:३० वाजता सलग दुसऱ्या दिवशी निदर्शने केली. त्यांनी एसआयआर तात्काळ थांबवण्याची आणि त्यावर चर्चा करण्याची मागणी केली. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी एसआयआर आणि मतचोरीच्या आरोपांवरून विरोधक दोन्ही सभागृहात आक्रमक असल्याचं पाहायला मिळालं.


























































