मी आठ युद्धे थांबवली, मला नोबेल द्यायला हवे

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थान-पाकिस्तान युद्ध थांबवल्याचा पुन्हा दावा केला. तसेच त्यांनी आठ युद्धे थांबवण्यासाठी नोबेल पुरस्काराची मागणी केली. मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत ट्रम्प यांनी हे विधान केले आहे. ट्रम्प म्हणाले, मी एखादे युद्ध थांबवले तर ते म्हणतात, तुम्ही पुढचे युद्ध थांबवल्यावर नोबेल मिळेल. आता ते म्हणतात की, मी रशिया-युव्रेन युद्ध थांबवल्यावर मला नोबेल मिळेल. मग बाकी आठ युद्धांचे काय? हिंदुस्थान-पाकिस्तान संघर्षासह अन्य युद्धांचाही विचार करा, जी मी थांबवली आहेत. मला प्रत्येक युद्धासाठी नोबेल मिळाला पाहिजे, पण मी तेवढा लोभी बनू इच्छित नाही.

यंदा शांतता नोबेल पुरस्काराने सन्मानित झालेल्या मारिया कोरिना मचाडो पेरिसल्का यांचा उल्लेख करत ट्रम्प म्हणाले, त्यांनाही नोबेल पुरस्कारासाठी मी पात्र असल्याचे वाटते. युद्धात मारल्या जाणाऱ्या निरपराध नागरिकांची अधिक चिंता वाटते, असे ते म्हणाले.

डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा पहिल्यांदाच केलेला नाही. गेल्या काही महिन्यांत ट्रम्प यांनी 60 हून अधिक वेळा युद्ध थांबवल्याचे दावे केले आहेत. ट्रम्प यांनी सोशल मीडियावर अनेक वेळा हिंदुस्थान-पाकिस्तान या दोन्ही देशांशी चर्चेनंतर युद्ध थांबवल्याचा दावा केला आहे.