
>> पराग खोत
काही नाटके काळाच्या कोलांटउड्या पार करूनही मनाला चटके देतात. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचं ‘संगीत संन्यस्त खड्ग’ हे त्यातलंच एक. हे नाटक म्हणजे केवळ काल्पनिक कथानक नाही तर राजकारण, तत्त्वज्ञान आणि सांस्कृतिक भान यांची तडफदार सांगड. द्रष्टय़ा सावरकरांच्या लेखणीने या नाटकाला जे परिमाण दिलं आहे, त्याला सर नाही.
गौतम बुद्धांच्या शांततेच्या विचारांचा प्रभाव शाक्यराष्ट्रावर दाटून आलेला तो काळ. हे नाटक त्या इतिहासाच्या वळणावर उभं राहतं. अहिंसेच्या मोहाने हजारो युद्धपुरुष संन्यासाच्या मार्गावर निघून गेले. संन्यास सुंदर, परंतु शत्रू दाराशी उभा राहिला तर? कोसल-मगधच्या आक्रमणात शाक्यांची वाताहत झाली आणि हातातल्या म्यान केलेल्या तलवारीच त्यांच्या विनाशाचं कारण ठरल्या. सावरकरांनी या ऐतिहासिक प्रसंगातून पोहोचवलेला संदेश आजही झणझणीतच आहे.
नाटकाची सुरुवात होते ती सिद्धार्थांच्या वैराग्यगमनाने. राजपुत्र हजारो अनुयायांसह मार्गस्थ होतात; पण पित्याचा विरोध, सेनापती विक्रमसिंहाची अस्वस्थता हेही चित्र तितपंच जिवंत. ‘लोककल्याणासाठी हे निराश्रित करणं योग्य नाही’ अशी धारणा असतानाही बुद्धांच्या अलौकिक प्रभावासमोर सर्वच नि-शस्त्र, नि-शब्द होतात आणि अखेर विक्रमसिंहही शस्त्रसंन्यास स्वेच्छेने स्वीकारतात.
काही वर्षे उलटतात. बुद्धांची शिकवण पसरलेली; पण शाक्यांच्या किल्ल्यातून शौर्य ओसंडून जाण्याऐवजी विरून गेलेलं. सेनापती विक्रमसिंहाचा पुत्र वल्लभ लढतो, पण कोसलांच्या आक्रमणापुढे पराभूत होतो. राज्य उद्ध्वस्त होत असताना, ‘फक्त विक्रमसिंहच हे विघ्न रोखू शकतात’ अशा विश्वासाने दूत त्यांच्यापर्यंत पोहोचतो. जनतेवरचे अत्याचार ऐकून विक्रमसिंहाचं मन विदीर्ण होतं; पण त्याच वेळी बुद्धांचा कठोर आदेश येतो ‘युद्धाकडे परतू नकोस.’ आणि येथून सुरू होतो तत्त्वांचा संघर्ष. अहिंसेचं श्रेष्ठत्व विरुद्ध स्वसंरक्षणाचा धर्म! सावरकरांनी हा वाद ज्या धारदारपणे रंगमंचावर उतरवला आहे, ते आजच्या जमान्यातही चपराक मारून जातं. शेवटी विक्रमसिंह आपली जुनी तलवार उचलतात “आता शरण नाही, केवळ रण!’’ आणि इथेच नाटक आपला संघर्षबिंदू गाठतं.
आजच्या काळात या नाटय़कृतीची रंगावृत्ती साकारण्याचं धाडस लेखक-दिग्दर्शक हृषीकेश जोशी यांनी दाखवलं आहे. संहितेतील बारकाव्यांना न्याय देत, वैचारिक संघर्ष संवादांतून धारदारपणे उभा करत त्यांनी नाटकाला कसदार रूप दिलं आहे. प्रमुख भूमिकांतील कलाकार नाटकाला जबरदस्त उंची देतात. ओंकार कुलकर्णींचा समग्रतेने साकारणारा बुद्ध मनात कोरला जातो, तर ऋत्विज कुलकर्णींचा प्रखर राष्ट्राभिमानी विक्रमसिंह नाटकाला रक्तसंचार देतो. वल्लभच्या भूमिकेत ओमप्रकाश शिंदे आणि सुलोचनाच्या भूमिकेत केतकी चैतन्य लक्षवेधी. विशेषत- केतकाRच्या नाटय़पदांना प्रेक्षकांनी ‘वन्समोअर’ देणं हेच त्यांचं कौतुक.
हृषीकेश जोशी आणि मयुरा रानडे यांनी साकारलेले शापंभट-क्षारा प्रसंग नाटकाला आवश्यक तो विरंगुळा देत असले तरी, काही ठिकाणी अति-अर्कचित्रात्मकतेची छटा जाणवते. काwशल इनामदारांचं संगीत, संदेश बेंद्रेंचं नेपथ्य, मयुरा रानडेची वेशभूषा आणि श्रीकांत देसाई यांची रंगभूषा सर्वांनी मिळून ऐतिहासिक कालखंड फारच प्रभावी केला आहे. वाद्यवृंदाची साथसंगत तर नाटकाची अर्धी जादू आहे.
1931मध्ये लिहिलेल्या या नाटकाचा आशय आजही तितकाच ताजा भासतो, हे सावरकरांच्या दूरदृष्टीचं प्रतीक. ‘शस्त्र आणि शास्त्र’ यांचा संतुलित मार्ग हा संदेश आजच्या गोंधळलेल्या काळात अधिकच महत्त्वाचा. काही विचारसरणी हे नाटक न पाहताच विरोध करतात, पण हे नाटक एकदा जरी पाहिलं तरी मतं बदलतील, इतका याचा आशय सक्षम आहे.
या धाडशी प्रयोगासाठी निर्माते रवींद्र माधव साठे, सहनिर्माते अनंत वसंत पणशीकर आणि व्यवस्थापक दीपक गोडबोले यांचे अभिनंदन!
लेखक – स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, दिग्दर्शक – हृषीकेश जोशी
कलाकार – ओमप्रकाश शिंदे, मयुरा रानडे, केतकी चैतन्य, ऋत्विज कुलकर्णी, श्रीराम लोखंडे, गौरव निमकर, प्रद्युम्न गायकवाड, शंतनू अंबडेकर, परमेश्वर गुट्टे, निरंजन जावीर, आशीष वझे, ओंकार कुळकर्णी, आणि हृषीकेश जोशी
नेपथ्य – संदेश बेंद्रे प्रकाश – अमोघ फडके वेशभूषाकार – मयुरा रानडे
निर्माते – रवींद्र माधव साठे, अनंत वसंत पणशीकर सूत्रधार – दीपक गोडबोले
पार्श्वसंगीत – कौशल इनामदार नृत्य- सोनिया परचुरे रंगभूषा – श्रीकांत देसाई युद्धतंत्र प्रशिक्षण – सुधीर कांबळे































































