
नागपूरमध्ये एका कुटुंबाचे हृदय पिळवटून टाकणारे दुहेरी हत्याकांड आणि लैंगिक शोषणाचे प्रकरण उघडकीस आले आहे. जून महिन्यात एका 35 वर्षीय महिलेने आणि तिच्या 17 वर्षांच्या मुलाने, आईवर होणाऱ्या कथित बलात्कार प्रयत्नाला प्रतिकार करताना बांधकाम साइटवरील एका कंत्राटदाराची हत्या केली होती. या घटनेनंतर महिला नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असताना, दुसरीकडे कुटुंबाला अनेक वर्षांपासून त्रास देणाऱ्या आणि छळणाऱ्या नराधम पित्यानेच तिच्या अनुपस्थितीत आपल्याच अल्पवयीन मुलींवर, ज्यांचे वय 9 ते 12 वर्षांदरम्यान आहे, मागील तीन महिन्यांहून अधिक काळ वारंवार बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे.
या भयानक अत्याचाराचा पर्दाफाश ऑक्टोबर महिन्यात झाला, जेव्हा पीडित कुटुंबातील 14 वर्षांच्या लहान मुलाने पित्याला विकृत कृत्य करताना पाहिले आणि त्वरित शेजाऱ्यांकडून मदत घेतली. शेजाऱ्यांनी तातडीने जवळच्या तृतीयपंथी समुदायाला या घटनेची माहिती दिली. या तृतीयपंथी सदस्यांनी त्वरीत आरोपीच्या घरी धाव घेऊन, पीडित मुलींची सुटका केली, नराधम पित्याला चांगलाच चोप दिला आणि त्याला वाठोडा पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी तातडीने आरोपी पित्याला अटक करून त्याच्यावर POCSO कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. सध्या पीडित मुलींना पुनर्वसन आणि समुपदेशनासाठी सरकारी निवारागृहात पाठवण्यात आले आहे.
या महिलेचा 14 व्या वर्षी विवाह झाला होता आणि अनेक वर्षांच्या घरगुती अत्याचारातून सुटका मिळवण्यासाठी तिने डिसेंबर २०२4 मध्ये आपल्या चार मुलांसह दिल्लीतून नागपूरला पलायन केले होते. नवीन आयुष्याची आशा घेऊन तिने आणि तिच्या मोठ्या मुलाने कुही परिसरात एका बांधकाम साइटवर काम सुरू केले होते. मात्र, कामाच्या आठव्याच दिवशी कंत्राटदाराने तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. महिलेने प्रतिकार केला असताना तिचा मुलगा मदतीला धावला आणि या झटापटीत कंत्राटदार गंभीर जखमी झाला व नंतर त्याचा मृत्यू झाला. यानंतर पकडल्या गेलेल्या आईला तुरुंगात आणि मुलाला सुधारगृहात पाठवण्यात आले होते.





























































