जाहिराती, मंत्र्यांच्या परदेश दौऱ्यावर कोट्यवधींची उधळपट्टी… निकाल शून्य! आदित्य ठाकरे यांचा सरकारवर हल्ला

फक्त सामंजस्य करारांवर आणि मंत्र्यांच्या विदेश दौऱ्यांवर कोटय़वधींची उधळपट्टी केल्यानंतर ‘निकाल’ मात्र शून्यच असल्याचा हल्ला शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज सरकारवर केला. आपल्या देशात रोजगार देऊ शकत नाहीत आणि दुसऱ्या देशात रोजगार देण्याची आश्वासने सरकार देत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

आदित्य ठाकरे यांनी आज ‘एक्स’वर सरकारची अकार्यक्षम धोरणे  आणि भ्रष्टाचारावर सरकारवर जोरदार टीका केली. दोन वर्षांपूर्वी जर्मनीमधील उद्योगांसाठी राज्यातून दहा हजार पुशल कामगार जर्मनीला देण्याबाबत सामंजस्य करार झाला. याच्या प्रसिद्धीसाठी राज्य सरकारने तब्बल पाच कोटी रुपये खर्चही केले, मात्र या सामंजस्य कराराला दोन वर्षे उलटून गेल्यानंतरही राज्यातून एकही पुशल कामगार राज्य सरकारने जर्मनीमध्ये पाठवलेला नाही. याबाबत प्रसारमाध्यमात वृत्तही प्रसिद्ध झाले आहे. यावरून आदित्य ठाकरे यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. जर्मनीसोबत सामंजस्य करार करून आणि स्वतः जर्मनीचा दौरा करून एकही पुशल कामगार जर्मनीला पाठवण्यात अपयश आल्याचेही ते म्हणाले. करार आणि स्वतःचे दौरे करण्यासाठी करदात्यांचे पैसे खर्च करायचे, मात्र निकाल ‘शून्य’, असा टोलाही त्यांनी हाणला.

घोटाळय़ांबाबत सरकार उत्तर देणार आहे का?

तत्कालीन शिक्षणमंत्र्यांनी जून 2024 मध्ये जर्मनीला भेट दिली होती. यावेळी 34 क्षेत्रासाठी पुशल मनुष्यबळ पुरवण्याबाबत करार करण्यात आला होता. दौऱयानंतर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. शालेय शिक्षण विभागाच्या गणवेश प्रकरणात घोटाळा करून राज्याची वाट लावणाऱयाला मात्र आता माजी शिक्षणमंत्र्यांच्या खात्यात घेण्यात आल्याचा टोलाही त्यांनी लगावला. हाच का महाराष्ट्रातील भाजप सरकारचा कारभार?, असा सवाल करीत अशा घोटाळय़ांना राजकीय आश्रय मिळत असल्याचेही ते म्हणाले. या प्रकरणांवर माजी मंत्री किंवा सरकारकारमधील कोणी उत्तर देणार आहे की नाही, असा सवालही आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.