
शिक्षक सेनेचा नांदेड जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटनांनी आज आयटीआय येथून विविध मागण्यांसंदर्भात भव्य मोर्चा काढला. टीईटी सक्ती, संच मान्यता रद्द करा या व इतर मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व शिक्षकांना टीईटी परीक्षा अनिवार्य करण्यात आली असून, मागच्याच महिन्यात याबद्दल एक परीक्षाही संपन्न झाली. सर्वोच्च न्यायालयाने टीईटी परीक्षा पास होणे बंधनकारक ठरविले असून, सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय रद्द करण्यात यावा, शिक्षकांच्या नियुक्तीचे कंत्राटीकरण थांबविण्यात यावे, जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करण्यात यावी, राज्यातील शिक्षकेत्तर कर्मचार्यांची बंद असलेली पद भरती तात्काळ सुरु करावी, सर्व शिक्षकांना मेडिकल/कॅशलेस योजना लागू करण्यात यावी, शिक्षण सेवक योजना रद्द करुन शिक्षकांना नियमित वेतनश्रेणी लागू करावी, पदवीधर शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणीत भेदभाव न करता मंजूर करावी, शिक्षकातील विविध अशैक्षणिक व ऑनलाईन उपक्रम तात्काळ थांबविण्यात यावे, वस्तीशाळेतील शिक्षकांची सेवा मूळ नियुक्ती तारखेपासून सर्व लाभासाठी ग्राह्य धरण्यात यावी, आश्रमशाळामध्ये कंत्राटी शिक्षक भरतीचे धोरण रद्द करण्यात यावे, कमी पटाच्या शाळा बंद न करता शिक्षणक्रम सुरु ठेवावा, शिक्षकांवर अशैक्षणिक कामाचा बोजा लादू नये, या व इतर मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. जिल्ह्यातील शिक्षक सेनेसह विविध संघटना व समन्वय समितीच्या सदस्य असलेल्या शिक्षकांनी या मोर्चात मोठा सहभाग नोंदवला. आयटीआय येथून सुरु झालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी शिक्षकांनी आपल्याा मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्यांना सादर केले.
शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष अंबुलगेकर, राज्य उपाध्यक्ष विठ्ठल चव्हाण, तानाजी पवार आदींनी यात सहभाग नोंदविला. यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष संतोष अंबुलगेकर यांनी सरकारचे शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी लक्ष वेधण्यासाठी व सरकारला जागे करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आल्याचे सांगितले. तर राज्य उपाध्यक्ष विठ्ठल चव्हाण यांनी टीईटी परीक्षा रद्द करण्यासंदर्भात राज्य शासनाने पुढाकार घ्यावा, संचमान्यतेच्या संदर्भात असलेल्या जाचक अटी रद्द करुन शासनाचा निर्णय रद्द करण्यात यावा, जिल्ह्यातील शिक्षकांचे प्रलंबित असलेले वैयक्तीक व सार्वजनिक प्रश्न त्वरित मार्गी लागावेत या मागण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आल्याचे सांगितले. आजच्या मोर्चामुळे शहरातील अनेक भागातील वाहतूक विस्कळीत झाली होती. मोर्चा विराट स्वरुपात निघाला होता. जिल्हाभरातील सर्व शिक्षकांनी आज एक दिवसाची रजा घेवून या मोर्चामध्ये सहभाग नोंदविला.





























































