नेहरूंचे योगदान पुसण्याचा पद्धतशीर प्रयत्न सुरू आहे, सोनिया गांधी यांचा भाजपवर हल्लाबोल

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नुकतीच देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या कारकिर्दीत घेतलेल्या निर्णयांवर टीका केली होती. पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची इच्छा होती की ‘बाबरी मशिदी’ची उभारणी सार्वजनिक निधीतून व्हावी. मात्र, सरदार पटेल यांनी तसे होऊ दिले नाही, असे विधान करून वाद ओढवला. त्यांच्या या विधानानंतर काँग्रेस संतप्त झाली. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी नाव न घेता भाजपचा समाचार घेतला आहे. नेहरूंचे योगदान पुसण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा हल्लाबोल सोनिया गांधी यांनी केला.

देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांची प्रतिमा मलिन करणे, त्यांना बदनाम करणे, त्यांचे चारित्र्य खराब करण्याचा पद्धतशीरपणे प्रयत्न भाजप करत असल्याची टीका काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी केली आहे. निमित्त होते ते दिल्लीमधील जवाहर भवन येथे नेहरू केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमाचे. या उद्घाटन सोहळ्यात सोनिया गांधी लोकांशी संबोधन करताना म्हणाल्या की, जवाहरलाल नेहरू यांना बदनाम करणे, त्यांना कमी लेखणे हे भाजप पद्धतशीरपणे करत आहे. नेहरू यांची प्रतिमा मलिन करणे हे एवढेच नव्हे तर, त्यांचे देशाच्या चळवळीतील कार्य नाकारणे हाही हेतू आहे. सोयीने नेहरुंचा वारसा नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टीकाही सोनिया गांधींनी केली.

महात्मा गांधींच्या हत्येला एकेकाळी कारणीभूत असलेली मानसिकता आता सत्ताधाऱ्यांमध्ये शिरली आहे, असे त्या म्हणाल्या. या विचारसरणीचे अनुयायी केवळ गांधींच्या मारेकऱ्यांचे गौरव करत नाहीत तर, देशाच्या मूलभूत मूल्यांना, संविधानाला आणि संस्थांना कमकुवत करण्याचा प्रयत्न करत असल्याचा संताप सोनिया गांधी यांनी यावेळी व्यक्त केली. सोनिया म्हणाल्या, “एवढ्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाच्या जीवनाचे आणि कार्याचे विश्लेषण आणि टीका होणे स्वाभाविक आहे आणि ती असली पाहिजे. मात्र, त्यांना बदनाम करण्याचा, त्यांना कमी लेखण्याचा आणि त्यांच्या शब्दांचा विपर्यास करण्याचा प्रयत्न अमान्य आहे.