नागरी उड्डाण मंत्रालयाकडून इंडिगोला कडक सूचना, उद्यापर्यंत प्रवाशांना रिफंड देण्याचे आदेश

इंडिगोने अचानक रद्द केलेल्या फ्लाईट्मुळे अनेक प्रवाशांना त्याचा फटका बसला आणि विमानतळावर एकच गोंधळ उडाला. याची दखल अखेर नागरी उड्डाण मंत्रालयाने घेतली आहे. प्रवाशांचे रिफंड तात्काळ देण्यात यावे, असे निर्देश नागरी उड्डाण मंत्रालयाने दिले आहेत. नियोजित वेळेनुसार रद्द किंवा विस्कळीत झालेल्या उड्डाणाशी जोडलेल्या प्रवाशांचे रिफंड रविवारी 7 डिसेंबर रात्री 8 पर्यंत द्यावे, असे मंत्रालयाने इंडिगोला म्हटले आहे.

उड्डाण मंत्रालयाने स्पष्ट निर्देश दिले आहेत की, ज्या प्रवाशांना फ्लाईट रद्द झाल्याने फटका बसला, त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे रिस्केड्यूलिंग शुल्क आकारले जाणार नाही. आदेशाने पालन न केल्यास कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. उड्डाणांच्या तक्रारींचे समाधान करण्यासाठी इंडिगोने विशेष (पेसेंजर सपोर्ट अॅण्ड रिफंड सेल) प्रवाशांना मदत करण्यासाठी आणि तिकीट परताव्याच्या प्रक्रिया हाताळण्यासाठी असलेला विभाग आहे. हा विभाग बाधित झालेल्या प्रवाशांशी संपर्क साधून त्यांना रिफंड आणि सामानाबाबत त्यांना माहिती देईल.

मंत्रालयाने इंडिगोला निर्देश दिले की, विमान रद्द किंवा विलंबामुळे हरवलेल्या सर्व सामानाचा मागोवा घेण्याचे आणि ते प्रवाशांच्या घरी किंवा दिलेल्या पत्त्यावर 48 तासांच्या आत पोहोचवा. प्रवाशांना सामानाची स्थिती, ट्रॅकिंग माहिती आणि डिलिव्हरीच्या वेळेबद्दल स्पष्ट माहिती देण्याचे निर्देशही विमान कंपनीला देण्यात आले आहेत. आवश्यक असल्यास, नियमांनुसार भरपाई देखील दिली जाईल. प्रवाशांना गैरसोय होऊ नये यासाठी देखरेख आणि सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यात आल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. ज्येष्ठ नागरिक, अपंग प्रवासी, विद्यार्थी, रुग्ण आणि अत्यावश्यक प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर विशेष लक्ष दिले जात आहे. मंत्रालयाने आश्वासन दिले की, परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले जात आहे आणि शक्य तितक्या लवकर पूर्ण सामान्य कामकाज पूर्ववत केले जाईल.