
सरकारच्या जल जीवन मिशनचे रायगडमध्ये तीनतेरा वाजले आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक घरात शुद्ध पाण्याचा पुरवठा व्हावा, या उद्देशाने जलजीवन मिशन अंतर्गत ठेकेदारांना दोनवेळा मुदतवाढ देण्यात आली. मात्र वाढीव मुदत देऊनही 1 हजार 422 योजनांपैकी 607 कामे लटकली असल्याने ‘हर घर जल’ योजनेला ‘घर घर’ लागली आहे. दरम्यान आतापर्यंत अनेक योजनांवर करोडो रुपयांचा निधी खर्च करूनदेखील जिल्ह्याची पाणीटंचाई संपत नसून टँकरमुक्ती कधी होणार, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
रायगड जिल्ह्यात जलजीवन मिशन योजनेंतर्गत 1 हजार 422 योजनांची कामे हाती घेण्यात आली. ही सर्व कामे डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्धिष्ट होते. मात्र दोन वर्षे उलटूनही कामे पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी ठेकेदारांना तब्बल दोनवेळा मुदतवाढ देण्यात आली. मात्र त्यानंतरही जिल्ह्यातील 607 योजनांची कामे अद्यापही अपूर्ण असल्याची बाब समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे 149 योजनांची कामे 50 टक्केही पूर्ण झालेली नसल्याने या योजनेचा चांगलाच फज्जा उडालेला पाहायला मिळत आहे.
‘जल’ स्वप्नांचे काय झाले?
ग्रामस्थांना स्वच्छ आणि शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे. तसेच गावातील महिलांचा त्रास कमी व्हावा, हे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून केंद्र सरकारमार्फत जलजीवन मिशन ही योजना राबवण्यात येत आहे. ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना ‘हर घर, नल से जल’ असे स्वप्न दाखवण्यात आले. मात्र रायगडमध्ये मागील सहा महिन्यांपासून योजनांची कामे ठप्प असल्याने त्या स्वप्नांचे काय झाले, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
हजारो कोटींचा निधी कुठे मुरला? 15 तालुक्यांमध्ये जलजीवन
मिशनची कामे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या वतीने हाती घेण्यात आली. यासाठी सुमारे 1 हजार 300 कोटी रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला. सर्व योजनांची कामे 2023 डिसेंबर अखेरपर्यंत करण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र ही कामे वेळेत पूर्ण करून घेण्यात जिल्हा परिषद प्रशासनाला अपयश आले. दरम्यान योजनेसाठी मंजूर झालेला हजारो कोटींचा निधी नेमका कुठे मुरला, असा संतप्त सवाल रायगडवासीय करत आहेत.


























































