प्रबोधन कौशल्य निकेतनमुळे ग्रामीण भागातील युवकांना मिळाली रोजगाराची संधी, शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत दीक्षांत समारंभ

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून स्थापन झालेल्या प्रबोधन कौशल्य निकेतनमुळे ग्रामीण भागातील तरुणांना रोजगाराची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. या संस्थेमुळे अनेकांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडून आले आहेत, असे प्रतिपादन शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी येथे केले आहे. माणगाव येथील प्रबोधन कौशल्य निकेतनचा दीक्षांत समारंभात ते बोलत होते.

हिंदुस्थानमध्ये भरपूर मनुष्यबळ आहे. सुशिक्षित युवकदेखील मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र त्यांना रोजगार आणि नोकऱ्या उपलब्ध नाहीत. त्यासाठी प्रत्येक शाळेत किमान कौशल्य आधारित प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. हिंदुस्थानात नोकऱ्यांची कमी नाही, परंतु कुशल कामगार नसल्याने नोकऱ्या उपलब्ध होत नाहीत. माणगाव तालुक्यात हा एक चांगला उपक्रम सुरू करण्यात आला असून त्याचा हजारो तरुणांना फायदा झाला आहे असे यावेळी शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी स्पष्ट केले.
याप्रसंगी एम. जी. एल.चे चक्रपाणी, सुशांत राऊत, प्रबोधन कौशल्य निकेतनचे अध्यक्ष नितीन शिंदे, पहलचे प्रमुख अंकुश भारद्वाज, नाना सावंत, डॉ. संतोष कामेरकर, कैलास शिंदे, गोविंद गावडे, पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे, निलेश थोरे, सुरेश दळवी उपस्थित होते.

कंपन्यांकडून मोलाची साथ

प्रबोधन कौशल्य निकेतनमधून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना रायगड जिल्ह्यातील कंपन्यांनी मोलाची साथ देऊन रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रबोधन कौशल्य निकेतनच्या इमारतीसाठी महानगर गॅस लि. यांनी सामाजिक दायित्व निधीतून सुमारे ३ कोटी ५० लाख इतका निधी दिला. या संस्थेत प्रशिक्षणाबरोबरच रोजगार उपलब्ध करून दिला जात आहे. या संस्थेमध्ये संगणक, परिचारिका, सौंदर्य प्रशिक्षण, वीजतंत्री, मोबाईल दुरुस्ती, ए. सी., फ्रीज रिपेरिंग, शिवणकाम, गॅस दुरुस्ती, इंग्रजी संवाद कौशल्य, प्लम्बिंग आदींचे प्रशिक्षण दिले जात आहे असेही सुभाष देसाई यांनी यावेळी सांगितले.