चंद्रपूरातील माणिकगड सिमेंट कंपनीच्या चुनखडी खाण प्रकल्पाचे आदिवासी शेतकऱ्यांनी काम बंद पाडले

चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील कुसुंबी- बांबेझरी येथे असलेल्या माणिकगड सिमेंट कंपनीच्या चुनखडी खाण प्रकल्पाचे काम आदिवासी शेतकऱ्यांनी आंदोलन करत बंद पाडले. हे प्रकल्पग्रस्त शेतकरी 15 महिन्यांपासून स्वतःच्या शेतजमिनीसाठी मोबदला किंवा नोकरी मागत ऊन -वारा- पावसा- पाण्यात संघर्ष करत आहेत. मात्र राज्य सरकार आणि कंपनी व्यवस्थापनाने प्रकरण निकाली काढण्यासाठी टाळाटाळ चालवली आहे.

2003 -2004 मध्ये माणिकगड सिमेंट कंपनीने आपल्या खाण विस्तारासाठी अधिकची 493 हेक्टर जमीन घेतली. मात्र प्रत्यक्षात कंपनीच्या ताब्यात शेकडो पटीने अधिक जमीन आहे. कंपनीने खोदकाम करून हजारो कोटींचा नफा मिळविला मात्र शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. तालुका, जिल्हा, वनखाते, महसूल खाते आणि चक्क विधिमंडळात देखील प्रश्न चर्चिला गेला मात्र तोडगा निघालेला नाही. परिणामी ते 15 महिन्यापासून आंदोलन करत आहेत. नागपुरातील विधिमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर कुसुंबी आणि बांबेझरी येथील कोलाम आदिवासींचा जगण्यासाठीचा संघर्ष ठळकपणे पुढं आलाय.