अबब! पाटणाच्या पुस्तक मेळाव्यात 15 कोटींचे पुस्तक, पुस्तकाच्या फक्त तीन प्रती प्रकाशित

आतापर्यंत आपण दोनशे चारशे जास्तीत जास्त हजार रुपयांपर्यंत पुस्तकं वाचली असतील. पण पाटणाच्या पुस्तक मेळाव्याततील एका पुस्तकाने सर्वांचेच लक्ष वेधले आहे, या मेळाव्यातील एका पुस्तकाची किंमत ऐकून सर्वच अवाक झाले आहेत. तब्बल 15 कोटी रुपये त्या पुस्तकाची किंमक असून हे पुस्तक जगातील सर्वात महागडे पुस्तक आहे. शिवाय या पुस्तकाच्या आशयाबाबत आणि लेखनाबाबत सर्वांचीच उत्सुकता वाढली आहे.

पुस्तकाचे लेखक रत्नेश्वर यांच्या म्हणण्यानुसार, 408 पानांच्या या पुस्तकांना त्यांनी ब्रम्हमुहूर्तकाळात 3 तास 24 मिनीटात लिहीले आहे. त्यांच्या माहितीनुसार 6 आणि 7 सप्टेंबर 2006 रोजी लिहीताना त्यांना ब्रम्हलोक यात्रा आणि आध्यात्मिक  अनुभव मिळाला. तो अनुभव त्यांनी शब्दबद्ध केला. पुस्तकात 43 अध्याय आहेत. पुस्तक प्रकाशना दरम्यान लेखकाने पुस्तक दाखवले मात्र कोणालाही पुस्तकाची पानं उलटायला दिली नाहीत. त्यामुळे वाचक आणि साहित्यप्रेमींमध्ये उलट सुलट चर्चा रंगल्या आहेत. लोकांना या पुस्तकात असे काय आहे की त्याची किंमत 15 कोटी रुपये असल्याचा प्रश्न पडला आहे. मात्र लेखकाने ते पुस्तक चाळण्याची परवानगी दिली नाही.

रत्नेश्वर म्हणाले की, या पुस्तकात त्यांचे आध्यात्मिक अनुभव, ध्यानाची अवस्था आणि रासलिलाचा प्रत्यक्ष साक्षात्कार त्यात आहे, हे पुस्तक दुख:चा शेवट आणि देवाच्या कृपेचा मार्ग दाखवते. सध्या, या पुस्तकाच्या फक्त तीन प्रती प्रकाशित झाल्या आहेत आणि त्या जगभरात उपलब्ध आहेत असे म्हटले जाते. लेखकाचा हेतू फक्त 11 खास व्यक्तींना ते वाटण्याचा आहे, ज्यांचा शोध सुरू आहे. 15 कोटी रुपयांच्या या अनोख्या पुस्तकाने पाटणा पुस्तक मेळ्यात जितकी उत्सुकता निर्माण केली आहे तितकेच प्रश्नही उपस्थित केले आहेत. त्यामुळे या 15 कोटी रुपयांच्या पुस्तकात नेमके काय रहस्य आहे याची चर्चा रंगली आहे.