
राजधानी दिल्लीतील वायुप्रदूषणाचा मुद्दा देशभर गाजत असून त्यावरून भाजपवर टीकेची झोड उठली आहे. त्यातच आता दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी केलेल्या अजब वक्तव्यामुळे भाजपचे हसे झाले आहे. हवेचा गुणवत्ता निर्देशांक म्हणजे तापमान असते, असे गुप्ता यांनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्याची जोरदार खिल्ली उडवली जात आहे.
हवेतील प्रदूषणाचे प्रमाण मोजण्यासाठी एक्यूआय (हवेचा गुणवत्ता निर्देशांक) ही संज्ञा वापरली जाते. याचसंदर्भात रेखा गुप्ता यांना एका वृत्तवाहिनीवरील मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी एक्यूआयचा अर्थ तापमान असा सांगितला. ‘एक्यूआय हे एक असे तापमान असते, ते कोणत्याही साधनाद्वारे मोजता येते आणि पाणी फवारणे हाच त्यावरचा एकमेव उपाय आहे,’ असे त्या म्हणाल्या.
भाजपने दिल्लीला ‘सर्कस’ भेट दिलीय! आदित्य ठाकरे यांचा टोला
रेखा गुप्ता यांच्या वक्तव्याचा संदर्भ देत शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी ‘एक्स’वरून भाजपवर सडकून टीका केली. ‘दिल्लीकरांनी अशा अधोगतीसाठी मते दिली असतील यावर माझा अजिबात विश्वास नाही. भाजपने दिल्लीला एक सर्कस भेट दिली आहे. जेणेकरून जनतेचे मनोरंजन होईल आणि भाजपला देश सामाजिक, राजकीय, आर्थिक, पर्यावरणीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अधिकाधिक खालच्या थराला नेता येईल, असे ते म्हणाले. दिल्लीत सर्व ठिकाणी भाजपचे सरकार आहे. महापालिका, राज्य आणि पेंद्र सगळेच त्यांच्या हाती आहे. त्या सर्वच पातळीवर दिल्लीला उद्ध्वस्त केले जात आहे, असा संताप आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.



























































