जयश्रीच्या भूमिकेत दिसणार तमन्ना भाटिया, व्ही. शांताराम चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित

हिंदुस्थानी चित्रपटसृष्टीतील महान दिग्दर्शक आणि निर्माते शांताराम राजाराम वणकुद्रे (व्ही. शांताराम) यांच्या जीवनावर आधारित ‘व्ही. शांताराम’ या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर आता ‘जयश्री’ या व्यक्तिरेखेची पहिली झलक सादर करण्यात आलीय. ही भूमिका अभिनेत्री तमन्ना भाटिया साकारत आहे. व्ही. शांताराम यांची सहकलाकार ते सहचारिणी असा भावस्पर्शी प्रवास जयश्री या व्यक्तिरेखेतून उलगडणार आहे. हा चित्रपट नवीन वर्षात प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटात ‘जयश्री’ ही केवळ व्ही. शांताराम यांची पत्नी नसून त्यांच्या आयुष्यातील पहिली प्रेरणा, कलात्मक सहप्रवासी आणि भावनिक आधारस्तंभ म्हणून साकारली जाणार आहे. सहकलाकार म्हणून सुरुवात होऊन विवाहापर्यंतचा प्रवास, प्रेम, तणाव, संवेदनशीलता आणि त्या काळातील सिनेमासृष्टीचे पडद्यामागचे वास्तव या चित्रपटातून उलगडले जाणार आहे. तमन्ना भाटियाच्या ‘जयश्री’च्या पोस्टरमुळे त्या कथेतला भावनिक आणि कलात्मक थर अधिक गडद झाला आहे. पडद्यावर व्ही. शांताराम आणि जयश्री यांचा सहप्रवास, त्यांच्या नात्यातील गुंफण पाहता येईल हा चित्रपट राजकमल एंटरटेन्मेंट, कॅमेरा टेक फिल्म्स आणि रोअरिंग रिव्हर प्रोडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने निर्मित असून राहुल किरण शांताराम, सुभाष काळे आणि सरिता अश्विन वर्दे हे निर्माते आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन अभिजीत देशपांडे यांनी केले आहे.

जयश्री ही व्यक्तिरेखा कलात्मकतेने भरलेली

पोस्टरमध्ये तमन्ना भाटिया गुलाबी साडीत मोहक अंदाजात दिसत आहे. निर्मात्यांच्या मते, जयश्री ही व्यक्तिरेखा भावनांनी आणि कलात्मकतेने ओतप्रोत भरलेली आहे. तमन्ना भाटिया एक उत्कृष्ट अभिनेत्री असून या भूमिकेत ती जणू त्या काळातून थेट आजच्या पडद्यावर आली आहे असे वाटते, असे निर्मात्यांनी म्हटलेय.