
ग्रामीण भागातील महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामविकास विभागामार्फत उमेद मॉल उभारण्यात येत आहे. त्याच धर्तीवर मुंबईतही उमेद मॉल उभारण्याबाबत पालिका आयुक्तांसोबत बैठक घेण्याचे आश्वासन ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी आज विधानसभेत दिले.
राज्यात पहिल्या दहा टप्प्यांत दहा जिल्ह्यांमध्ये उमेद मॉल उभारण्यात येणार आहे. यासाठी राज्य सरकारने 200 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. याच धर्तीवर मुंबईतील महिलांच्या बचत गटासाठी जागा देण्याची मागणी प्रश्नोत्तराच्या तासात शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी केली. ग्रामीण भागासोबत प्राधान्याने शहरी भागात मॉलचे काम कधी सुरू करणार आहात, असा सवाल सुनील प्रभू यांनी केला. या चर्चेत भाग घेताना योगेश सागर यांनी मुंबईतल्या चोवीस वॉर्डातील पालिकेची जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. मंत्री जयकुमार गोरे म्हणाले की, मुंबईतही उमेद मॉल झाले पाहिजेत. त्याचा नक्कीच आपण विचार करू. ग्रामविकास खाते पालिका आयुक्तांसोबत चर्चा करून ज्या ठिकाणी उपलब्ध करून देणे शक्य आहे त्याठिकाणी जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.




























































