
विरार मधील चाळ बिल्डर समय चौहान याच्या हत्या प्रकरणी मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेने कुख्यात गँगस्टर सुभाषसिंग ठाकूर याला उत्तर प्रदेशातील फतेहगढ मध्यवर्ती कारागृहातून आज ताब्यात घेतले. मंगळवारी त्याला वसईत आणले जाणार आहे.
विरार मध्ये राहणार्या समय चौहान या चाळ बिल्डरची २६ फेब्रुवारी २०२२ रोजी विरारच्या मनवेलपाडा येथे गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात १३ आरोपींना मोक्का अंतर्गत अटक करण्यात आली होती. कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन गँगस्टर सुभाषसिंग ठाकूर हा या हत्याकांडातील मुख्य आरोपी होता. तो जे जे हत्याकांड प्रकरणात उत्तर प्रदेशात फतेहगढ कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. मात्र २०१९ पासून उपचाराच्या नावाखाली बनारस हिंदू विद्यापीठाच्या सर सुंदरलाल रुग्णालयात होता. त्यामुळे त्याला या प्रकरणात अटक करता येत नव्हती. २०२४ मध्ये सुभाषसिंग ठाकूर याची कारागृहात रवानगी करण्यात आली होती. त्यानंतर सुभाषसिंग ठाकूर याला वसईत आणण्यासाठी पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया सुरू केली होती.
सोमवारी गुन्हे शाखेचे पथक उत्तर प्रदेशात रवाना झाले आणि कारागृहातून सुभाषसिंग ठाकूर याचा ताबा घेतला. त्याला मंगळवारी मुंबईत आणले जाईल, अशी माहिती पोलीस उपायुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे यांनी दिली.
वसई विरार शहरात असलेल्या गुन्हेगारांना सुभाषसिंग ठाकूर याचा आश्रय असल्याचे सांगण्यात येते. किंबहुना अनेक गुन्हेगारी कारवाया या सुभाषसिंग ठाकूर याच्या सांगण्यावरून होत असतात. समय चौहान प्रकरणात सुभाषसिंग ठाकूर पोलिसांच्या ताब्यात आल्याने अनेक गंभीर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीस अधिकार्यांनी व्यक्त केली आहे.






























































