देवाला निवांत झोपूही देत नाहीत! बांके बिहारी मंदिरात श्रीमंतांच्या विशेष पूजेवर सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे

मंदिरांमध्ये श्रीमंत लोकांकडून पैसे घेऊन विशेष पूजा करण्याच्या प्रथेवर आज तीव्र आक्षेप घेतला. अशा प्रथांमुळे देवांच्या आराम करण्याच्या वेळी भरपूर पैसे देणाऱयांना विशेष पूजेची परवानगी दिली जाते. हे तर देवांचे शोषण असून त्यांना तुम्ही झोपूही देत नाही, अशा शब्दांमध्ये सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी मथुरा वृंदावन येथील बांके बिहारी मंदिर प्रशासनाला खडे बोल सुनावले.

बांके बिहारी मंदिरात दर्शनाची वेळ उच्च व्यवस्थापन समितीने 2.30 तासांनी वाढविली. सप्टेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या या निर्णयाविरोधात मंदिरातील गोस्वामींनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्याची सुनावणी न्या. सूर्य कांत आणि न्या. जॉयमाल्य बागची यांच्या खंडपीठासमोर झाली. मंदिर व्यवस्थापन समितीच्या निर्णयावर सरन्यायाधीश कांत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, आराम करण्याच्या वेळी देवांना आराम कुठे दिला जातो? सर्वसामान्य भाविक यावेळी दर्शन घेऊ शकत नाही. मात्र, त्यावेळी श्रीमंत आणि प्रभावशाली लोक भरघोस पैसे मोजून विशेष पूजा करतात. दर्शनाच्या वेळांना बदलता येणार नाही, यामुळे मंदिराशी संबंधित विधीविधानदेखील बदलते. देवांचा आराम करण्याच्या वेळा ठरल्या आहेत. त्यात दखल देता येणार नाही, असे सरन्यायाधीशांनी स्पष्ट केले. सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी व्यवस्थापन समितीकडून उत्तर मागितले असून उत्तर प्रदेश सरकारलादेखील नोटीस दिली आहे. जानेवारी महिन्यात याप्रकरणी पुढील सुनावणी होईल.

दर्शन वेळ का वाढविली?

बांके बिहारीच्या लाईव्ह स्ट्रीमिंगसाठी दोन कंपन्यांनी अर्ज केला होता. त्यापैकी एका कंपनीला नियमांविरोधात काम दिल्याचा आरोप सेवादारांनी केला आहे. तसेच भाविकांच्या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी दर्शनाची वेळ वाढविण्यात आली होती. या निर्णयाचे सेवादारांनी पालन करण्यास नकार दिला आहे.

हे तर देवांचे शोषण

याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी सांगितले की, बांके बिहारीची पूजा बाल रूपात होते. त्यामुळे देवाला आरामाची गरज असते. तसेच पुजेची वेळ पवित्र असते. हा केवळ प्रशासनिक मुद्दा नाही. प्राचीन परंपरांशी याचा संबंध आहे. त्यावर न्यायालयाने म्हटले की, हे तर देवांचे शोषण आहे. देवांच्या आराम करण्याच्या वेळात विशेष दर्शन आणि पूजेला परवानगी द्यायला नको.