नाव नव्हे फॉर्म! हिंदुस्थानच्या संघात अखेर फॉर्मला मान, निवड समितीने पहिल्यांदा दाखवले धाडस

हिंदुस्थानच्या टी-20 संघात अखेर भीतीचा ताप उतरला आहे. मोठी नावं पाहून घाम फुटायचा, तोंडात बोटं घालून ‘यांना कसं काढायचं?’ म्हणणारी निवड समिती यावेळी चक्क डोळे उघडे ठेवून संघ निवडताना दिसली. या संघात आता दिग्गज नाहीत. वशीलेबाजही नाहीत. त्यामुळेच निर्णयात दिग्गजांची भीतीही नव्हती. हा खेळाडू काढला तर टीव्ही स्टुडिओत गदारोळ होईल, हा बाहेर गेला तर सोशल मीडियावर ट्रोल केलं जाईल. हे सगळे विचार यावेळी थेट कचरापेटीत टाकण्यात आले. निवड समितीने चक्क मोकळा श्वास घेत संघ निवडला. खेळाडूंच्या क्लासपेक्षा फॉर्मला वरचढ मानण्याचं धाडस त्यांनी दाखवलं.

एकेकाळी ‘आपोआप निवड’ असलेला शुभमन गिल थेट बाहेर आणि त्याच पठडीतला यशस्वी जैसवालही संघाबाहेरच. हे सगळं पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या, काहींच्या भुवया तर कायमच्या वरच राहिल्या. पण निवड समितीने यावेळी भावनांना बाकावर बसवून कामगिरीला मैदानात उतरवलं.

गिलची तर ‘भविष्यातला पॅप्टन’, ‘तीनही फॉरमॅटचा वारस’ म्हणून आरती ओवाळली जात होती, त्याला थेट बाकावर बसवले. कारण साधं आहे. फॉर्म गायब, पण नाव हजर अशी सवलत यावेळी त्याला दिली नाही.

2024 चा टी-20 वर्ल्ड कप जिंकणाऱ्या जगज्जेत्या संघातील तब्बल 7 खेळाडू आता फक्त आठवणीत उरले आहेत. रोहित, विराट आणि जाडेजा यांनी आधीच निवृत्तीचा श्रीफळ स्वीकारला आहे. उरलेल्यांनाही निवड समितीने सांगून टाकलं, मेडल मिळाला म्हणून पुढचा वर्ल्ड कप फुकट मिळत नाही. दुसरीकडे, 5 नवखे खेळाडू थेट वर्ल्ड कपच्या रणांगणात उतरायला सज्ज झाले आहेत. अनुभव नाही? तरी चालेल. नाव मोठं नाही? अजून बरं! कामगिरी आहे? मग सीट तुमची पक्की. हा संदेश एव्हाना सर्वांपर्यंत पोहोचला असेल.

मात्र खूप टीका झाल्यानंतर ईशान किशनला पुन्हा संघात घेतलं गेलं. म्हणजे निवड समिती ऐकते, पण फक्त तेव्हाच, जेव्हा टीका डोक्यात जाते, कानात नाही. ईशाननेही सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच भन्नाट आणि सुस्साट खेळ केला. झारखंडला जेतेपद जिंकून दिले. त्याचे अचूक टायमिंग त्याच्या पथ्यावर पडलं. ईशानला वगळणं सोप्पं नव्हतं. त्यामुळे तो संघात दिसतोय. एकूणच, जुन्याचा मोह सोडून नव्याला संधी देत निवड समितीने अखेर धाडसी फलंदाजीसारखं शॉट खेळलं आहे. यावेळी बायोग्राफी नव्हे, स्कोअरकार्ड उघडून पाहिलं गेलेय. त्यामुळे निवड समितीचा हा शॉट सीमारेषेपलीकडे जाईल की थेट हातातच बसेल, ते मैदानावरच कळेल. पण एवढं नक्की की यावेळी निवड समिती ‘सेफ गेम’ खेळलेली नाही. इतपं धाडस निवड समितीने याआधी कधीच दाखवलं नव्हतं. या धाडसाचं कौतुक करावंच लागेल.

2024 च्या जगज्जेत्या संघातील खेळाडू

सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, जसप्रीत बुमरा, शिवम दुबे,  अक्षर पटेल, हार्दिक पंडय़ा, कुलदीप यादव.

जगज्जेत्या संघातील हे खेळाडू नाहीत

रोहित शर्मा, विराट कोहली, रवींद्र जाडेजा (तिघेही निवृत्त), यशस्वी जैसवाल, ऋषभ पंत, मोहम्मद सिराज आणि यझुवेंद्र चहल

यांनी पुनरागमन केले

वरुण चक्रवर्थी 2021 च्या वर्ल्ड कपमध्ये संघात होता तर ईशान किशनसुद्धा 2023 च्या वर्ल्ड कपमध्य संघाचा भाग होता.

प्रथमच वर्ल्ड कपमध्ये खेळणार

तिलक वर्मा, रिंकू सिंह, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा