इंग्लंडची पुन्हा राख, अ‍ॅशेस ऑस्ट्रेलियाकडेच, अ‍ॅडलेडमध्येही इंग्लंडचा ‘बॅझबॉल’ चिरडला

ऑस्ट्रेलियाने इंग्लंडची अ‍ॅडलेडमध्येही राख केली आणि अ‍ॅशेस आमचंच आहे म्हणत ते आपल्याकडेच राखले. सलग दोन कसोटी गमावलेल्या इंग्लंडकडून आज चमत्काराची अपेक्षा होती. पण ऑस्ट्रेलियन गोंलदाजांनी इंग्लंडच्या ‘बॅझबॉल’चा अॅडलेडवरही चेंदामेदा केला आणि तिसरी कसोटी 82 धावांनी जिंकत कसोटी विजयाच्या हॅटट्रिकसह अॅशेस आपल्याकडेच राखला. आता सिडनी आणि मेलबर्न कसोटी केवळ औपचारिकता पूर्ण करण्यासाठी खेळविल्या जातील.

झुंज दिली, पण हरलेच

शनिवारच्या 6 बाद 207 वरून इंग्लंडने खेळ पुढे सुरू केला. जॅमी स्मिथ (60) आणि विल जॅक्स (47) यांनी संघर्षपूर्ण खेळ करत कसोटीची रंगत वाढवली. दोघांनी सातव्या विकेटसाठी 91 धावांची भागी रचत इंग्लंडच्या जिवात जीव आणला. मात्र ही जोडी फुटल्यानंतर जॅक्स आणि ब्रायडन कार्सने 52 धावांची भर घालत आपण जिंकू शकतो अशी आशा दाखवली. मात्र विजयापासून 98 धावा दूर असताना जॅक्स बाद झाला आणि इंग्लंडच्या आशेचा जॅकही निघाला. मग ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी इंग्लंडची उरलेली विकेट्स अवघ्या 15 धावांत गुंडाळली आणि  82 धावांच्या अॅशेस विजयावर शिक्कामोर्तब केले.

 ट्रव्हिस हेडचे वादळ

ऑस्ट्रेलियाच्या तिसऱ्या डावात हेडने 170 धावांची ऐतिहासिक खेळी करत इंग्लंडच्या गोलंदाजांची संपूर्ण योजना चिरडून टाकली. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने 371 धावा केल्या होत्या, त्यात अॅलेक्स पॅरीच्या शतकाचा मोठा वाटा होता. इंग्लंडचा पहिला डाव 286 धावांत संपुष्टात आला. तिसऱ्या डावात हेड-पॅरी जोडीने ऑस्ट्रेलियाला 349 धावांपर्यंत नेले आणि इंग्लंडसमोर अशक्यप्राय 435 धावांचे लक्ष्य उभे केले.

स्टार्कचा कहर, इंग्लंडची आशाच संपुष्टात

दुसरा नवा चेंडू हातात घेताच स्टार्कने इंग्लंडच्या उरलेल्या आशांवर पाणी फेरले. एकामागोमाग एक विकेट घेत इंग्लंडच्या फलंदाजांची तारांबळ उडवली. अचूक यॉर्कर आणि आक्रमक लाईन-लेंथसमोर इंग्लंडच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. दुखापतग्रस्त नॅथन लायन मैदानाबाहेर असतानाही ऑस्ट्रेलियाची पकड ढिली पडली नाही. हे इंग्लंडसाठी आणखी लाजिरवाणे ठरले.

स्टोक्सचा ऑस्ट्रेलियन स्वप्नभंग

या पराभवासह इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सचे ऑस्ट्रेलियात अॅशेस जिंकण्याचे स्वप्न पुन्हा एकदा धुळीस मिळाले. ‘बॅझबॉल’चा मोठा गाजावाजा झाला, पण दबावाखाली ही आक्रमक रणनीती फुगलेला फुगा ठरली. सलग तिसऱ्या कसोटीत पराभव पत्करत इंग्लंडने मालिका हातातून घालवली आणि अॅशेसवरचा हक्क ऑस्ट्रेलियाने निर्विवादपणे सिद्ध केला.