अहिल्यानगरमध्ये अजित पवार गटाचा सुपडासाफ

जिह्यातील  11 नगरपरिषदा आणि एक नगरपंचायतच्या निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया आज पार पडली. जामखेड वगळता सर्व ठिकाणी मतमोजणी शांततेत झाली. या निवडणुकीत भाजप 7, शिंदे गट 2, काँग्रेस 1, तर अपक्ष 2 जण नगराध्यक्ष झाले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी नेवासामध्ये आपला गड राखला आहे. पालकमंत्री भाजपचे राधाकृष्ण विखे यांच्या शिर्डी व राहात्यात आपली सत्ता कायम केली, तर सर्वाधिक महत्त्वाच्या संगमनेर नगरपरिषदेत येथे माजी मंत्री बाळासाहेब थोरात व सत्यजित तांबे यांनी पुन्हा सत्ता खेचून आणली आहे. शेवगावमध्ये भाजपाला फटका बसला असून, तिथे बंडखोर शिंदे गटाचा उमेदवार विजयी झाला. दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचा सुपडासाफ झाला असून, त्यांना नगराध्यक्षपदासाठी यश मिळालेले नाही.

अहिल्यानगर जिह्यामध्ये पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील,  माजी मंत्री बाळासाहेब थोरात, सभापती राम शिंदे यांच्यासह अनेक दिग्गजांचे मतदारसंघ या निवडणुकीवर पणाला लागलेले होते. आपापले गड राखण्यामध्ये हे नेते यशस्वी झाले आहेत. काही ठिकाणी भाजप आणि अजित पवार गटाला झटका बसला आहे.

राहात्यात विखे गटाची सत्ता

राहाता नगरपरिषदेत भाजप विखे गटाचे डॉ. स्वाधीन गाडेकर हे नगराध्यक्षपदासाठी विजयी झाले. येथील 20 पैकी 19 जागांवर विखे-पाटील गटाने विजय मिळवत सत्ता राखली. नगराध्यक्षपदासाठी भाजपचे डॉ. स्वाधीन गाडेकर विरुद्ध लोकक्रांती सेनेचे धनंजय गाडेकर यांच्यात लढत झाली. यात डॉ. गाडेकर 4660 मतांनी विजयी झाले.

शिर्डीत नगराध्यक्षपदी जयश्री थोरात

शिर्डी नगरपरिषदेत नगराध्यक्षपदी भाजपच्या जयश्री विष्णू थोरात 4940 मतांनी विजयी झाल्या. शिर्डीत विखेंचीच जादू चालते, हे सिद्ध झाले. या निवडणुकीपूर्वी जयश्री थोरात या यापूर्वीही नगराध्यक्ष म्हणून कार्यरत होत्या. शिर्डीकरांनी थोरात व विखेंवर पुन्हा एकदा विश्वास दाखवल्याचे दिसले. शिर्डीची निवडणूक एकतर्फी झाली. जागतिक कीर्तीचे देवस्थान असलेल्या शिर्डी पालिकेवर पुन्हा एकदा विखे गटाचा झेंडा फडकला.

देवळाली प्रवराच्या चाव्या भाजपकडेच

राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा नगरपरिषदेवर पुन्हा एकदा भाजपची सत्ता आली. नगराध्यक्षपदासाठी भाजपचे सत्यजित कदम यांच्यावर जनतेने पुन्हा विश्वास दाखवला. या निवडणुकीत भाजपचे 15 नगरसेवक निवडून आले. विरोधी काँग्रेसला 4 जागांवर समाधान मानावे लागले. वंचित बहुजन आघाडी व शिंदे गटाचा एक-एक नगरसेवक निवडून आला. माजी आमदार चंद्रशेखर कदम यांच्यावर देवळालीतील जनतेने पुन्हा एकदा विश्वास दाखवल्याचे या निकालानंतर दिसले. बहुजन वंचित आघाडीचे जिल्हाध्यक्ष संतोष चोळके यांचा विजय चर्चेचा विषय ठरला होता. या निवडणुकीत वंचितचे 2, शिंदे गट 1 आणि 4 अपक्ष उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले.

पाथर्डीत राजळेंची जादू कायम

पाथर्डीमध्ये आमदार मोनिका राजळे यांची जादू पुन्हा एकदा चालल्याचे दिसून आले. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचे अभय आव्हाड विजयी झाले. पालिका पुन्हा एकदा भाजपच्या ताब्यात आली आहे. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते प्रताप ढाकणे यांनीही या निवडणुकीसाठी जोर लावला होता. भाजपने 14 जागा जिंकल्या. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला 5 जागांवर विजय मिळाला. प्रभाग पाचमध्ये भाजप उमेदवार शीतल लोहिया आणि अपक्ष दीपाली बंग यांना समान मते पडल्याने चिठ्ठी काढून निकाल काढला. यात अपक्ष दीपाली बंग विजयी झाल्या. येथे भाजपचे नंदकुमार शेळके हे सहाव्यांदा विजयी झाले, तर मंगला कोकाटे या सलग पाचव्यांदा निवडून आल्या आहेत.

श्रीगोंद्यात सुनीता खेतमाळीस नगराध्यक्षपदी

अत्यंत चुरशीच्या झालेल्या श्रीगोंदा नगरपरिषदेच्या निवडणुकीत चौरंगी लढत झाली होती. या निवडणुकीत नगराध्यक्षपदी भाजपच्या सुनीता संतोष खेतमाळीस यांनी बाजी मारली. माजी नगराध्यक्ष शिंदे गटाच्या नेत्या शुभांगी पोटे यांचा या निवडणुकीत पराभव झाला. चौरंगी लढतीत आमदार विक्रम पाचपुते यांची जादू पुन्हा एकदा चालल्याचे दिसले. आमदार पाचपुते यांच्यावर श्रीगोंदाकरांनी पुन्हा एकदा विश्वास ठेवल्याचे दिसले. येथे 22 पैकी 13 जागांवर भाजपने विजय मिळविला.  शिंदे गटाचे नऊजण विजयी झाले. येथे अजित पवार गट आणि महाविकास आघाडीला खातेही उघडता आले नाही.

शेवगावात भाजपला फटका

शेवगावच्या निवडणुकीत शिंदे गटाच्या माया अरुण मुंडे या नगराध्यक्षपदासाठी विजयी झाल्या. राष्ट्रवादीच्या विद्या लांडे, भाजपच्या रत्नामाला फलके आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या परवीन काझी यांना पराभवाचा सामना करावा लागला. शेवगाव पालिका निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट व शिवसेना हे महायुतीचे तिन्ही पक्ष समोरासमोर होते. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात भाजपचे नेते अरुण मुंडे यांनी शिवसेना शिंदे गटाची वाट धरत नगराध्यक्षपदाची उमेदवारी आपल्या पत्नीला मिळवून दिली. ही त्यांची चाल यशस्वी ठरल्याचे दिसले.

राहुरीत पुन्हा तनपुरे गटाची सत्ता

अत्यंत अटीतटीच्या झालेल्या राहुरी नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्षपदी तनपुरे गटाच्या विकास आघाडीचे भाऊसाहेब मोरे विजयी झाले. भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला. या निवडणुकीत विकास आघाडीने 17 जागांवर विजय मिळवला, तर भाजपच्या हाती फक्त 7 जागा लागल्या. या निवडणुकीत राहुरीकरांनी पुन्हा एकदा तनपुरेंवर विश्वास दाखवल्याचे दिसले. तनपुरे गटाने दोन्ही राष्ट्रवादीला एकत्र करत ही निवडणूक लढवली होती. महाविकास आघाडी व भाजपमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत चांगलीच चुरस रंगली. परंतु या निवडणुकीत शिंदे गटाने स्वतंत्र पॅनल केल्याने महायुतीची ताकद विभागली होती. तरीही भाजपने सात जागांवर विजय मिळवला.

नेवाशात क्रांतिकारी पक्षाची सरशी

नेवासा नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखालील क्रांतिकारी शेतकरी पक्षाची सरशी झाली. नगरसेवकपदाच्या 17 जागांपैकी 9 जागांवर क्रांतिकारी शेतकरी पक्षाने विजय मिळविला. मात्र, महायुतीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉ. करणसिंह भाऊसाहेब घुले हे विजयी झाले. राष्ट्रवादी काँग्रेसने 16 उमेदवार रिंगणात उतरले होते; पण त्यांना खातेही उघडता आले नाही. क्रांतिकारी पक्षाचे विजयी उमेदवार ः जयश्री चंद्रकांत शिंदे, जितेंद्र भाऊसाहेब कुर्हे, संभाजी शिवाजी धोत्रे,  सागर ऊर्फ स्वप्नील राजेंद्र मापारी, शहिदाबी इलियास खान पठाण, सोनल राहुल चव्हाण, नसरीन मुक्तार शेख, प्रतिभा जालिंदर गवळी, श्रीमती शोभा प्रताप व्यवहारे हे विजयी झाले.

अहिल्यानगर जिह्यातील नगराध्यक्ष

जामखेड – प्रांजल चिंतामणी (भाजप), श्रीरामपूर – करण ससाने (काँग्रेस), नेवासा – डॉ. करणसिंह घुले (शिंदे गट), राहाता – स्वाधीन गाडेकर (भाजप), संगमनेर – डॉ. मैथिली तांबे (संगमनेर सेवा समिती), शिर्डी – जयश्री थोरात (भाजप), श्रीगोंदा – सुनीता खेतमाळीस (भाजप), पाथर्डी – अभय आव्हाड (भाजप), राहुरी – भाऊसाहेब मोरे (महाविकास आघाडी), शेवगाव – माया मुंढे (शिंदे गट), कोपरगाव – पराग संधान (भाजप), देवळाली प्रवरा – सत्यजित कदम (भाजप).

श्रीरामपुरात काँग्रेसचे वर्चस्व; नगराध्यक्षपदी करण ससाणे

श्रीरामपूर नगरपरिषदेच्या झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने पुन्हा निर्विवाद वर्चस्व सिद्ध करत श्रीरामपूर नगरपालिकेवर एकहाती सत्ता आणली. काँग्रेस व भाजपने प्रतिष्ठsच्या केलेल्या निवडणुकीत भाजपला पराभवाचा धक्का बसला. यासह माजी नगराध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकपदाच्या उमेदवार अनुराधा आदिक यांचाही या निवडणुकीत पराभव झाला. या निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाला खातेही उघडता आले नाही. नगराध्यक्षपदी काँग्रेसचे उमेदवार करण ससाणे यांनी विजय मिळविला. नगरसेवकपदाच्या काँग्रेसने सर्वाधिक 20 जागा जिंकत बहुमत राखले. भाजप 10, तर शिंदे गट 3 आणि एका अपक्ष उमेदवाराने विजय संपादन केला आहे.

जामखेड नगरपरिषदमध्ये भाजपची सरशी

जामखेड नगरपरिषद निवडणुकीत सभापती प्रा. राम शिंदे व आमदार रोहित पवार यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. यात भाजपने गड राखला आहे. नगराध्यक्षपदासाठी भाजपाच्या उमेदवार प्रांजल अमित चिंतामणी यांनी विजय संपादन केला आहे, तर 15 नगरसेवक निवडून आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पाच जागेवर विजयी, तर वंचित बहुजन आघाडी दोन जागा, शिंदे गट एक जागा व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष एक अशा प्रकारे विजयी उमेदवार आहेत. नगराध्यक्षपदासाठी भाजपाच्या उमेदवार प्रांजल अमित चिंतामणी साडेतीन हजार मतांपेक्षा जास्त मतांनी विजयी झाल्या आहेत.

कोपरगावात महिला मतांचा कौल ठरला निर्णायक

कोपरगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत मतदारांनी अखेर स्पष्ट कौल दिला आणि नगराध्यक्षपदासाठी पराग संधान यांच्या पारडय़ात विजय टाकला. निवडणुकीच्या सुरुवातीपासूनच रंगत वाढवत गेलेल्या या प्रचारात शेवटच्या टप्प्यात महिला मतदारांचा कौल निर्णायक ठरला.

घडय़ाळ चिन्हावर निवडणूक लढविणारे काका कोयटे यांनी नवीन शहर भाग आणि काही वॉर्डमध्ये जोरदार पकड दाखविली. मात्र, मशाल व अपक्ष उमेदवारांमुळे झालेले मतविभाजन त्यांच्या अडचणीचे ठरले. शिंदे गटाचे राजेंद्र झावरे यांनी काही भागात आघाडी घेतली; पण ती संपूर्ण शहरात पोहोचू शकली नाही. दरम्यान, भरत मोरे (मशाल) आणि विजय वहाडणे (बॅट–अपक्ष) यांनी मिळविलेल्या मतांमुळे लढत तिरंगीच राहिली आणि त्याचा फायदा भाजप उमेदवाराला झाला.