
Ashes 2025 मधील तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा पराभव केला. ऑस्ट्रेलियाने आपल्या या विजयासह मालिका सुद्धा खिशात घातली आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये आतापर्यंत तीन सामने पार पडले आणि तिन्ही सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाने बाजी मारली. इंग्लंडच्या या पराभवावर रोहित शर्माने भाष्य केलं आहे.
रोहित शर्मा रविवारी (21 डिसेंबर 2025) गुरुग्राममध्ये आयोजित एका इव्हेंटसाठी गेला होता. यावेळी त्याने उपस्थितांसमोर विविध विषयांवर भाष्य केले. तेसच त्याने इंग्लंडचा पराभव आणि ऑस्ट्रेलियेन खेळपट्टी यावरही भाष्य केलं आहे. तो म्हणाला की, “ऑस्ट्रेलियामध्ये खेळणं सर्वात कठीण आहे. तुम्ही इंग्लंडला त्याबद्दल विचारू शकता.” असं रोहित शर्मा हसत म्हणाला. सध्या सुरू असलेल्या अॅशेस मालिकेत इंग्लंडला तिन्ही सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाने रडवलं आहे. त्यामुळे त्यांच्यावर मालिका पराभवाची नामुष्की ओढावली आहे.
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या अॅशेस कसोटी मालिकेतील पहिल्या तिन्ही सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाने वर्चस्व निर्माण केलं आहे. पर्थ आणि ब्रिस्बेन कसोटीमध्ये ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा 8-8 विकेटने फक्त तीन दिवसांमध्येच फडशा पाडला. तर तिसऱ्या कसोटीमध्ये इंग्लंडला कमॅबक करून मालिकेत चुरस निर्माण करण्याची संधी होती. मात्र, तिसऱ्या सामन्यातही ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा 82 धावांची पराभव केला आणि मालिका सुद्धा जिंकली.

























































