
नगरपालिका, नगर पंचायत निवडणुकीत अत्यंत विपरीत परिस्थितीत काँग्रेस पक्षाने विचारधारेच्या ताकदीवर लढा दिला. कोणतीही आर्थिक रसद नसताना केवळ लोकशाही मूल्यांवर विश्वास ठेवून सत्ताधाऱयांच्या धनशक्तीविरोधात संघर्ष केला. या निवडणुकीत काँग्रेसचे 41 नगराध्यक्ष व 1006 नगरसेवक विजयी झाले. काँग्रेस संपली म्हणणाऱ्यांना या निकालाने चोख उत्तर दिले आहे, असा टोला कॉँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजप नेत्यांना लगावला आहे.
भाजप व एकनाथ शिंदे यांच्या पक्षाने पैशाचा प्रचंड वापर करून प्रशासन व निवडणूक आयोगाच्या मदतीने विजय मिळवला असला तरी जनतेच्या मनात आजही काँग्रेस आहे व पुढेही ती कायम राहील. ही विचाराची लढाई आहे आणि काँग्रेस विचारधारेपासून तसूभरही दूर गेलेला नाही. नगरपालिका निवडणुकीत मिळालेला विजय हा महानगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकांसाठी ऊर्जा देणारा आहे. महाभ्रष्ट भाजप महायुतीपासून महाराष्ट्र वाचविण्याचा काँग्रेसचा हा लढा अखंडपणे सुरूच राहील असे सपकाळ म्हणाले.
निवडणुकीत विजय-पराजय होत असतात, काँग्रेस पक्षाने अनेक उन्हाळे पावसाळे पाहिले आहेत. पराभवाने खचून न जाता मोठय़ा उत्साहाने लढण्याची ताकद, ऊर्जा व दृढ निश्चय काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आहे. कार्यकर्त्यांचा हा विश्वासच पक्ष संघटनेसाठी महत्त्वाचा असतो. याचा प्रत्यय या निवडणुकीत आला. काँग्रेसची विचारधारा हीच देशाला तारणारी आहे. जाती-धर्माच्या नावावर सामाजिक सलोखा बिघडवून राजकीय पोळी भाजणाऱया व पैशाच्या जोरावर सर्व निवडणुका जिंकता येऊ शकतात असा समज जनतेने खोडून काढला आहे, असे सपकाळ म्हणाले.
नागपूर विभागात 14 नगराध्यक्ष व 340 नगरसेवक, अमरावती विभागात 9 नगराध्यक्ष व 236 नगरसेवक, मराठवाडय़ात 5 नगराध्यक्ष व 156 नगरसेवक, पश्चिम महाराष्ट्रात 3 नगराध्यक्ष आणि 47 नगरसेवक, उत्तर महाराष्ट्रात 2 नगराध्यक्ष व 47 नगरसेवक आणि कोकण विभागात 1 नगराध्यक्ष आणि 26 नगरसेवक निवडून आले आहेत. यासोबत काँग्रेस पुरस्कृत स्थानिक आघाडय़ांचे 7 नगराध्यक्ष व 154 नगरसेवक निवडून आले आहेत.




























































