
नाताळची सुट्टी लागताच नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी मुंबई, ठाणेकर कुटुंबकबिल्यासह रायगडातील अलिबाग, काशिद, मुरुड, श्रीवर्धनमध्ये पोहोचले आहेत. फेसाळत्या समुद्राच्या लाटांचा आनंद लुटत आणि माशांवर ताव मारून मनसोक्त मौजमजा करण्यास सुरुवात झाली आहे. रायगडातील सर्व पर्यटनस्थळे गर्दीन ओव्हरपॅक झाली असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रस्ते, चौक, समुद्रकिनारे, बाजारपेठा येथे सध्या रोज गर्दीच गर्दी दिसून येत आहे. हॉटेल्स, कॉटेजेस, लॉजचे दर दुप्पट झाले असून त्यांचे बुकिंगही फुल्ल झाले आहे. आता सर्वांना प्रतीक्षा आहे ती नव्या वर्षाचा पहिला मर्योदय अनभवण्याची. तोपर्यंत जल्लोष सरूच राहील.
माशांचे दर वाढले
आजपासून पर्यटकांचा लोंढा रायगडकडे वाढत चालला असून या भागातील आवडत्या माशांवर ताव मारण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. मासळीचे दर ५० ते ६० टक्क्यांनी वाढल्याने पर्यटकांच्या खिशाला चाट बसणार आहे, पण हौसेला मोल नाही म्हणत पर्यटक बिनधास्तपणे रोजची चिंता विसरून निसर्गाचा मनमुराद आनंद लुटत आहेत.
- महिलांची छेडछाड करण्यांवर नजर ठेवण्यासाठी दामिनी पथक, बीट मार्शल तसेच साध्या गणवेशातील पोलीस ठिकठिकाणी नेमले जाणार आहेत. त्यामध्ये होमगार्डचाही सहभाग असणार आहे.
- अलिबाग, किहिम, वरसोली, मांडवा, काशिद, मुरुड, दिवेआगर, श्रीवर्धन या समुद्रकिनाऱ्यांसह पाली बल्लाळेश्वर, महड वरदविनायक, हरिहरेश्वर शंकर मंदिर, सालाव बिर्ला मंदिर येथील देवस्थानांना अधिक पसंती दिली आहे, तर रायगड, जंजिरा, कुल ाबा, कोर्लई किल्ला बघण्यासाठीही पर्यटकांची गर्दी होत आहे.
मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूककोंडी
नाताळच्या सलग सुट्ट्यांमुळे मुंबई-पुणे महामार्गावर आज दिवसभर मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी दिसून आली. अनेक जण पुणे, लोणावळा, खंडाळा येथे सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गेले असून वाहतककोंडीत अडकल्याने त्यांना मनस्ताप सहन करावा लागला.


























































