भाईंदरमध्ये वाळूवाफियांचा नायब तहसीलदारांवर हल्ला; सात जणांवर गुन्हा दाखल; पसार आरोपींचा शोध

वाळूमाफियांनी भाईंदरच्या नायब तहसील दारांवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्री घडली आहे. पाच ते सहा जणांच्या टोळक्याने अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत मारहाण केली असून यात पथकातील काही कर्मचारी जखमी झाले आहेत. मात्र या घटनेनंतर वाळूमाफिया आणि त्यांचे गुंड वाळूचा ट्रक घेऊन पसार झाले आहेत. याप्रकरणी काशीगाव पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मीरा-भाईंदरचे नायब तहसीलदार प्रथमेश भुर्के (३२) हे २४ डिसेंबर रोजी पहाटे २ च्या सुमारास त्यांच्या पथकासह मुंबई-अहमदाबाद हायवेवर हॉटेल फाऊंटनजवळ गस्तीवर होते. यावेळी वाळूने भरलेला एक हायवा (एमएच ०४ एमजी ७६८६) मुंबईच्या दिशेने येताना दिसला. नायब तहसील दारांनी इशारा करूनही हायवा चालक थांबला नाही. पथकाने मोटारसायकल वरून पाठलाग करून काशिमीरा येथील हॉटेल पाली व्हिलेजसमोर हायवा अडवला. त्यानंतर चालकाने गाडी थांबवल्यावर मोबाईलवरून मालकाला बोलावून घेतले. काही वेळातच दोन कारमधून पाच जण घटनास्थळी दाखल झाले.

गोंधळ उडताच गाडी घेऊन चालकाची धूम
घटनास्थळावर आलेल्या गुंडांनी नायब तहसीलदार भुर्के व त्यांच्या सहकाऱ्यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की करत मारहाण केली. या गोंधळाचा फायदा घेत हायवा चालक वाहन घेऊन दहिसरच्या दिशेने पळून गेला. त्यानंतर कारमधील पाचही आरोपी पळून गेले. या गंभीर प्रकारानंतर नायब तहसीलदार प्रथमेश भुर्के यांनी काशीगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी सात अनोळखी व्यक्तींविरुद्ध सरकारी कामात अडथळा, मारहाण आणि दमदाटी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अन्वर शेख करत आहेत.