
राज्यात महानगरपालिका निवडणुकीत सर्वच पक्षांमध्ये मोठय़ा प्रमाणावर बंडखोरी झाली. काही ठिकाणी बंड शांत करण्यात यश आले, मात्र अनेक ठिकाणी बंडखोर उमेदवार रिंगणात कायम आहेत. बंडखोरीचा एक वेगळा पॅटर्न लातूरमध्ये उदयास आला आहे. भाजपने उमेदवारी नाकारलेल्या बंडखोरांनी ‘निष्ठावंत कार्यकर्ता आघाडी’ स्थापन केली आहे. या उमेदवारांनी चिन्ह वाटपाच्या वेळी आम्हाला एकच चिन्ह देण्याची मागणी केली. ती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळली. मात्र, यानिमित्ताने ही एक वेगळी आघाडी तयार झाली असून यामुळे भाजपची डोकेदुखी वाढली आहे.
महापालिका निवडणुकीच्या आखाडय़ात अनेक बंडखोर उमेदवार उतरले आहेत. भाजपमध्ये हे प्रमाण जास्त आहे. उमेदवारी देताना डावलल्यामुळे जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केले. पक्षाने बराच दबाव आणल्यानंतरही अनेकांनी अर्ज मागे घेतले नाहीत. आता लातूरमध्ये नितीन शेटे यांच्या नेतृत्वाखाली निष्ठावंत कार्यकर्ता आघाडी स्थापन झाली आहे. या आघाडीत 28 बंडखोर उमेदवार एकत्र आले आहेत. शिक्षणासह इतर क्षेत्रात वेगवेगळे पॅटर्न देणाऱ्या लातूरमध्ये उदयास आलेल्या या नव्या पॅटर्नची आता राज्यभरात चर्चा आहे.
निष्ठावंत आघाडीचे समीकरणही ठरले
निष्ठावंत कार्यकर्ता आघाडीने निवडणुकीचे चित्र पाहून समीकरणही ठरवले आहे. महायुतीतील घटक पक्ष असलेल्या अजित पवार आणि एकनाथ शिंदे गटाशी हातमिळवणी करून भाजपला धक्का देण्याची तयारी ही आघाडी करीत आहे. आघाडीचे उमेदवार नाहीत, तेथे शिंदे आणि पवार गटाला मदत करू, असे समीकरण आघाडीने समोर ठेवले आहे.


























































