शिट्टी, कपबशी आणि पतंगसाठी खेचाखेची, कोल्हापुरात चिन्हांवरून अपक्षांमध्ये वाद; अखेर चिठ्ठी काढून केले वाटप

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर महापालिका निवडणुकीत आता कोणकोण रिंगणात आहेत, याचे चित्र स्पष्ट झाले आहे. निवडणुकीत अनेक अपक्ष उमेदवार प्रस्थापितांविरोधात लढत आहेत. या उमेदवारांना आवडीचे चिन्ह मिळावे यासाठी बरीच धडपड करावी लागते. कोल्हापूर महापालिकेत चिन्ह वाटपाचा टप्पा पार पडला. त्यावेळी शिट्टी आणि कपबशी या चिन्हांसाठी वादावादी झाली.

कोल्हापुरात 81 जागांसाठी 327 उमेदवार रिंगणात आहेत. शहरातील 7 निवडणूक कार्यालयात चिन्ह वाटपाची प्रक्रिया झाली. अपक्ष उमेदवारांकडून शिट्टी, कपबशी आणि पतंग या चिन्हांना सर्वाधिक मागणी होती. जवळपास सर्वच प्रभागातील अपक्षांचा या चिन्हांसाठी आग्रह होता. काही प्रभागांमध्ये एकाच चिन्हासाठी एकापेक्षा जास्त उमेदवारांनी आग्रह धरल्यामुळे वाद निर्माण झाला. अखेर चिठ्ठय़ा टाकून पसंतीच्या चिन्हांचा निर्णय घेण्यात आला.

पहिले मागेल त्यालाच चिन्ह मिळेल

चिन्ह वाटपामध्ये बरेच वाद होतात. ते टाळण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जो पहिले मागेल त्यालाच चिन्ह देण्याचे जाहीर केले. ज्या चिन्हाला जास्त मागणी होती, ते पहिले मागणी करणाऱ्याला देण्यात आले, मात्र त्यावरूनही वाद झाले होते.