
मुंबईत शिवसेना-मनसे-राष्ट्रवादी युतीचा प्रचाराचा धडाका सुरू झाला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पश्चिम उपनगरातील अनेक शाखा आणि उमेदवारांच्या निवडणूक प्रचार कार्यालयांना भेट दिली व शिवसैनिकांशी संवाद साधला. या झंझावाती दौऱ्याने सर्वत्र चैतन्य पसरले असून वातावरण भगवेमय झाले आहे.
दहिसर देवीपाडा येथील शाखेला भेट देऊन उद्धव ठाकरे यांनी प्रभाग क्र. 12 च्या उमेदवार सारिका झोरे यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या. शाखा क्र. 6 ला भेट देऊन उद्धव ठाकरे यांनी प्रभागातील उमेदवार संजना वेंगुर्लेकर यांना निवडून देण्याचे आवाहन मतदारांना केले. प्रभाग क्र. 2 च्या उमेदवार धनश्री कोलगे, प्रभाग क्र. 3 च्या उमेदवार रोशनी कोरे-गायकवाड, मागाठणेतील प्रभाग क्र. 5 च्या उमेदवार सुजाता पाटेकर, प्रभाग क्र. 4 चे उमेदवार राजू मुल्ला यांच्या कार्यालयांना भेटी देऊन उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला व सूचना केल्या.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांने देवीपाडा प्रभाग क्र. 12 च्या उमेदवार सारिका झोरे यांच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन केले. यावेळी शिवसेना सचिव आमदार मिलिंद नार्वेकर, विभागप्रमुख उदेश पाटेकर, शुभदा शिंदे, श्वेता बोराडे, सचिन मोरे, योगेश देसाई, माधुरी खानविलकर, सिनेट सदस्य शशिकांत झोरे उपस्थित होते.

प्रभाग क्रमांक 7 चे उमेदवार सौरभ घोसाळकर यांच्या मुख्य निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन उद्धव ठाकरे यांनी केले. यावेळी शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर, माजी आमदार विलास पोतनीस व पदाधिकारी उपस्थित होते.
जो जो मुंबईप्रेमी त्याने आमच्यासोबत यावे!
ही लढाई आपल्या अस्मितेची आहे. जो जो महाराष्ट्रप्रेमी आहे, जो जो मुंबईप्रेमी आहे, अगदी भाजपचा कार्यकर्ता असला तरी त्याने आमच्यासोबत यावे. उघड आमच्यासोबत येता येत नसेल तर त्याने आमच्या उमेदवाराला मतदान करावे. याचं कारण एकच आहे, आपल्याला मुंबई वाचवायची आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
































































