
तपोवनातील वृक्षतोडीचे सरकारचे मनसुबे उधळण्यासाठी नोव्हेंबरमध्ये शिवसेनेने आंदोलन केले. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी भेट देऊन नाशिककरांच्या लढय़ाला मोठे बळ दिले. याच पार्श्वभूमीवर रविवारी महानगरप्रमुख प्रथमेश गीते यांच्यासह प्रभाग क्रमांक 15 मधील उमेदवारांनी वृक्ष रक्षणाचा संकल्प पुन्हा व्यक्त केला. तपोवन वाचवण्यावर ठाम असल्याचे प्रतिज्ञापत्र पर्यावरणप्रेमींकडे देत असल्याचे सांगितले.
माईस हब उभारण्यासाठी तपोवनातील अठराशेहून अधिक वृक्षांच्या कत्तलीचा घाट महापालिकेने घातला आहे. याला कडाडून विरोध दर्शवत शिवसेनेने 30 नोव्हेंबर रोजी महापालिकेसह शासनाविरोधात आंदोलन केले. नाशिककरांच्या तपोवन वाचवा चळवळीला पाठिंबा दिला. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी 27 डिसेंबर रोजी तपोवनाला भेट दिली, पर्यावरणप्रेमींशी संवाद साधला. सरकारने आचारसंहिता संपताच तपोवनाला रिझर्व्ह फॉरेस्ट जाहीर करण्याची मागणी केली. आपले उमेदवार तपोवन वाचवण्यासाठी पर्यावरणप्रेमींकडे प्रतिज्ञापत्र लिहून देतील, असेही सांगितले होते.
प्रभाग क्रमांक 15 मधून शिवसेना महानगरप्रमुख प्रथमेश वसंत गीते, सीमा विशाल पवार आणि गुलजार कोकणी हे निवडणूक लढवत आहेत. प्रभागाचा सर्वांगीण विकास, जनसेवेसोबतच निसर्गसेवेचा वसा कायम जपू, अशी ग्वाही त्यांनी नागरिकांना दिली आहे. त्यांनी आज रविवारी तपोवनाला भेट दिली. पर्यावरणप्रेमींशी संवाद साधून तपोवन वाचवण्याचा संकल्प उमेदवार म्हणून तसेच नाशिककर म्हणून पुन्हा एकदा बोलून दाखवला. त्याबाबतचे प्रतिज्ञापत्रही तिघांच्या वतीने देण्यात आले. तपोवनप्रश्नी सभागृहात आवाज उठवू, एकाही झाडावर कुऱहाड चालवू देणार नाही, अशी ग्वाही दिली. या वेळी संदीप भोनोसे यांच्यासह पर्यावरणप्रेमी उपस्थित होते.


























































