
कुंभमेळ्याच्या नावाखाली झाडे तोडायची, नंतर ती जमीन उद्योगपतींच्या घशात घालायची, असा हल्लाबोल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपवर केला आहे. आज नाशिकमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची संकयुक्त संयुक्त सभा हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानात पार पडली. यावेळी बोलताना ते असं म्हणाले.
सभेत बोलताना राज ठाकरे म्हणाले की, “आज अनेक वर्ष महानगरपालिकेच्या निवडणूक रखडलेल्या आहेत. याची कारणे कोणालाही देता येणार नाही, सांगता येणार नाही. इतकी वर्ष या निवडणुका घ्यायला का लागल्या? कशासाठी लागल्या? चार वर्ष मुद्दत संपून देखील, या महानगरपालिकेच्या निवडणूक का होत नव्हत्या, मला असं वाटतं, का होत नव्हत्या? याचे उत्तर हे आताच्या सरकारने दिलं पाहिजे. इतक्या वर्षानंतर या निवडणुका होत आहेत.”
राज ठाकरे म्हणाले की, “महाराष्ट्रात सत्ताधारी पक्षाचे ६०-६०, ७० उमेदवार बिनविरोध निवडून येतात. म्हणजे तिकडच्या मतदारांना मतदानाचा अधिकारही देणार नाही तुम्ही? काही वेळेला दहशतीतून, जास्तीत जास्त वेळेला पैसे… काय आकडे ऐकतोय, कोणाला १ कोटी, कोणाला २ कोटी, कोणाला ५ कोटी. आमच्या कल्याण-डोंबिवलीत एका प्रभागात एका घरातले तिघेजण उभे आहेत. काय ऑफर आली असेल, तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. एका प्रभागातील तीन जणांना, जे तिघे एका घरतील आहेत, त्यांना १५ कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली. कोणाला २ कोटी, कोणाला ५ तर, कोणाला १० कोटी, येतात कुठून इतके पैसे? या लेव्हलला, इतपर्यंत महाराष्ट्राची परिस्थिती तुम्ही आणली. एक तर उभं राहू द्यायचं नाही, माणसं विकत घ्यायची. भीती घालायची. दहशत निर्माण करायची आणि अशा वातावरणात तुम्ही निवडणुका घ्यायला बघताय?”, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
ते म्हणाले की, “नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाकडे जुनी काम करणारी माणसे होती ना, म्हणजे ५२ साली जनसंघ नावाने जन्माला आलेला एक पक्ष, त्याला 2026 ला पोरं भाड्याने घ्यावी लागत आहेत. तुमचे कार्यकर्ते, तुमची माणसे, तुम्ही उभी केली होती ना, मग दुसऱ्यांचे कशाला कडेवर घेऊन नाचताय. याचं कारण, जो पक्षात येथे काम करतोय त्याला शून्य किंमत आहे. मी समजू शकतो की, एखाद्या मतदारसंघामध्ये दोन चांगले लोक असतात किंवा तीन जण चांगली लोक असतात. त्या तीन जणांमध्ये एखादा निवडावा लागतो, बाकीच्या दोघांना देता येत नाही, असं असेल तर मी समजू शकतो. कारण जागाच एक असते. पण जी लोक सतत इतकी वर्ष काम करत आहेत, त्यांना पूर्णपणे बाजूला सारून, दुसऱ्या पक्षातील माणूस घ्यायचा आणि त्याला उभं करायचं, हा तुम्ही त्या कार्यकर्त्याचा अपमान नाही करत आहात, बाहेरून माणसे लागतात तुम्हाला? आणत आहेत ते आणत आहेत, मात्र ते काही आनंदानी येत नाहीय. रात्री पैसे पोहोचवले जातात.”
राज ठाकरे पुढे म्हणाले, “आमचे मित्र संजय राऊत म्हणाले, गिरीश महाजन यांना तपोवनात झाडे छाटायची आहेत. मात्र झाडे छाटण्याआधी त्यांनी स्वतःच्या पक्षामधील कार्यकर्ते छाटले. पहिली पक्षामधील लोक छाटली, बाहेरून झाडे मागवली आणि ती आता पक्षात लावत आहेत. ही कोणती परिस्थिती, हे कोणते राजकरण, या कोणत्या निवडणुका सुरू आहेत महाराष्ट्रामध्ये? २०१२ साली येथे मनसेची सत्ता आली. २०१७ साली येथे देवेंद्र फडणवीस आले. म्हणाले, मी नाशिक दत्तक घेतो. त्या सगळ्या गोष्टींना नाशिककर भुलले आणि आम्ही जी कामे करून ठेवली होती, ती सगळे विसरले. दत्तक घेतो म्हटल्यानंतर हा बाप परत फिरकलाच नाही. काय काय आणि कोणत्या कोणत्या गोष्टी करतो म्हणून सांगितल्या होत्या. २०१२ मध्ये जेव्हा आम्ही येथे सत्तेत आलो, त्यावेळीही कुंभमेळा झाला होता, अत्यंत यशस्वी झाला होता. त्यावेळी सर्वपक्षीय नगरसेवकांच्या साथीने उत्तम कुंभमेळा झाला. त्यावेळी एकही झाड कापलं गेलं नाही. आता का कापलं जातंय? त्यावेळी जेही सांधू-संत आले होते, ते म्हणाले उत्तम कुंभमेळा झाला. त्यावेळी जे प्रशासक होते आणि नगरसेवक त्यांचा सत्कार झाला. येथे, बोस्टन आणि अमेरिकेतही सत्कार झाला की, उत्तमरीत्या कुंभमेळा हाताळला गेला. मग आता काय चालू आहे? तपोनावातील झाडं म्हणजे नुसती झाडे तोड नाही, यांचं हे सगळं आगोदरच ठरतं आहे. उद्योगपतींसाठी ही जागा रिकामी करायची, यावरती आता कुंभमेळा करायचा, कुंभमेळा झाल्यानंतर सगळे साधू-संत जेव्हा आपल्या घरी जातील, त्यानंतर उद्योगपतीच्या घशात ही जमीन घालायची.”

































































