
नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत वनमंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या नगरविकास विभागाचे अक्षरशः वाभाडे काढले. यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. सरकारमध्ये असलेला माणूस बेधडकपणे सत्य सांगतोय. दोन महानगरपालिकेत कसा भ्रष्टाचार सुरू आहे हे एक मंत्री उघडपणे बोलतोय. फडणवीसांना हवे तेच गणेश नाईक बोलत आहेत, असे खासदार संजय राऊत सोमवारी माध्यमांशी बोलताना म्हणाले.
रविवारी शिवतीर्थावरील ऐतिहासिक सभेनंतर ठाकरे बंधुंची तोफ ठाण्यात धडाडणार आहे. याबाबत विचारले असता राऊत म्हणाले की, माझ्या हातात असते तर आजच्या सभेचे अध्यक्षपद गणेश नाईक यांना दिले असते. खरे म्हणजे नवी मुंबई, ठाण्याचे राजकारण गणेश नाईक गाजवत आहेत. गणेश नाईक यांचा प्रत्येक शब्द तोलावा आणि मापावा अशा प्रकारे ते टाकत आहेत. गणेश नाईक काय चुकीचे सांगत आहेत? गणेश नाईक म्हणतात, दोन शहरात झालेल्या भ्रष्टाचारामुळे या लोकांना एक दिवस तुरुंगात जावे लागेल.
गणेश नाईक यांचे खरे आहे. या लोकांना तुरुंगात जावेच लागेल. फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील एक मंत्री सांगतोय. कुणाविषयी सांगतोय, तर फडणवीसांच्या मंत्रिमंडळात जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या विषयी सांगतोय. फडणवीसांनी गणेश नाईक यांना शांत केले का? नाही. याचा अर्थ गणेश नाईक जे बोलताहेत, ते फडणवीसांना हवे तेच बोलत आहेत. लवकरच नाईक यांचा नागरी सत्कार करणार आहोत, असेही राऊत म्हणाले.
भ्रष्टाचाऱ्यांसोबत सत्तेत बसणार नाही, गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंना पुन्हा डिवचले
एक माणूस बेधडकपणे सत्य सांगतोय. आम्हीही सांगतोय, पण सरकारमध्ये असलेली व्यक्ती सांगतेय. या दोन महानगरपालिकेत कसा भ्रष्टाचार सुरू आहे हे एक मंत्री उघडपणे बोलतोय. अशा धाडसी माणसाचा गौरव जनतेनेही केला पाहिजे. गणेश नाईक जे सांगताहेत ते महाराष्ट्राने ऐकले आहे. गणेश नाईक म्हणतात मला हायकमांडने परवानगी द्यावी, मी यांचा टांगा पलटी करेन. माझे आव्हान आहे, तुम्ही महाराष्ट्राचे नेते आहात. आपण पूर्वी शिवसेनेत होतात. तुम्ही शरद पवारांबरोबरही काम केले आहे. भ्रष्टाचाऱ्यांचा टांगा पलटी करायला हाय कमांडची गरज लागत नाही. आपला आंतररात्मा सांगतो की भ्रष्टाचाराविरोधात लढाई केली पाहिजे. गणेश नाईकांना ती लढाई केली पाहिजे. त्यांच्यात ती क्षमता आहे, असेही राऊत म्हणाले.
शिवतीर्थावरील सभा गेमचेंजर, ‘आम्ही तुमच्या पाठीशी आहोत’, ठाकरेंचा महाराष्ट्राला संदेश! – संजय राऊत
ही ठरवून चाललेली कुस्ती आहे का?
काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक घोषणा केली. महापालिका त्यांच्या ताब्यात आली, तर ते पुण्यात मेट्रो आणि बस सेवा मोफत करणार आहेत. हे उपमुख्यमंत्री बोलत आहेत आणि त्याच्यावर मुख्यमंत्र्यांनी टीका केली. माझे अजित पवारांना आव्हान आहे. आपण राज्याचे अर्थमंत्री आहात. फक्त पुण्यात बस सेवा आणि मेट्रो मोफत कशाला, मुंबई-ठाण्यातही करा. त्या-त्या महापालिकांना तेवढा निधी द्या. पुण्यात मोफत करणार असाल तर महाराष्ट्रातील प्रत्येक शहरातील नागरिकांना बस सेवा किंवा मेट्रो सेवा मोफत मिळण्याचा अधिकार आहे. अजित पवार थापा मारत असतील त्या थापेमारीला आळा घाला. अजित पवार भाजपवर टीका करत आहेत, तरी ते मंत्रिमंडळात आहेत. ही काय ठरवून चाललेली कुस्ती आहे का? असा सवालही राऊत यांनी केला.





























































