
देशाचे लक्ष लागून राहिलेला केंद्र सरकारचा सर्वसाधारण अर्थसंकल्प आज, 1 फेब्रुवारी रोजी संसदेत मांडला जाणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन सकाळी 11 वाजता अर्थसंकल्पीय भाषण करतील. या अर्थसंकल्पाविषयी उद्योग जगतासह सर्वसामान्यांमध्येही उत्सुकता आहे.
पुढील काही महिन्यांत पश्चिम बंगालसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पात काही वेगळ्या घोषणा केल्या जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ नीतीला केंद्र सरकार कसे उत्तर देणार, सोने आणि चांदीचे गगनाला भिडलेले भाव स्थिर राखण्याच्या दृष्टीने अर्थसंकल्पात काय घोषणा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
26 वर्षांनंतर रविवारी बजेट
तब्बल 26 वर्षांनंतर रविवारी अर्थसंकल्प मांडला जात आहे. यापूर्वी, 28 फेब्रुवारी 1999 रोजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी रविवारी अर्थसंकल्प मांडला होता. निर्मला सीतारामन यांना सलग नवव्यांदा अर्थसंकल्प मांडण्याचा मान मिळेल.





















































