
मध्य रेल्वेने 1 फेब्रुवारी ते 26 एप्रिलपर्यंत दोन्ही प्लॅटफॉर्मवर ट्रफिक व पॉवर ब्लॉक जाहीर केला आहे. या काळात मडगाव-सीएसएमटी तेजस एक्स्प्रेससह अनेक मेल/एक्स्प्रेस दादर स्थानकातून सुटणार आहेत. मंगळुरू-सीएसएमटी एक्स्प्रेस ठाण्यापर्यंत धावणार आहे. लांब पल्ल्याच्या गाडय़ांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आल्याने प्रवाशांची गैरसोय होणार आहे.
रेल्वे जमीन विकास प्राधिकरणामार्फत (आरएलडीए) सीएसएमटी स्थानकाच्या पुनर्विकासाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून सीएसएमटीच्या प्लॅटफॉर्म क्र. 16 व 17 वर पुढील 85 दिवस ब्लॉक असणार आहे. या काळात दोन्ही प्लॅटफॉर्मवरील रेल्वे वाहतूक बंद ठेवून तेथे पायाभूत व इतर आवश्यक कामे केली जाणार आहेत. येत्या 1 फेब्रुवारीपासून अप दिशेने येणाऱ्या अनेक मेल-एक्स्प्रेस पुढील सुचना मिळेपर्यंत दादर स्थानकातून चालवण्यात येणार आहेत. त्यात मडगाव-सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस, अमरावती-सीएसएमटी एक्स्प्रेस, बल्लारशाह-सीएसएमटी नंदीग्राम एक्स्प्रेस, हावडा–सीएसएमटी एक्स्प्रेस, भुवनेश्वर- सीएसएमटी कोणार्प एक्स्प्रेस, बिदर-सीएसएमटी एक्स्प्रेस, लातूर-सीएसएमटी एक्स्प्रेस या गाडय़ांचा समावेश असेल. तसेच मंगळुरू-सीएसएमटी एक्स्प्रेस ठाण्यापर्यंत चालवण्यात येणार आहे.






















































