
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बुधवार, 28 जानेवारी रोजी विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना ताजी असताना राज्यातील भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये मंगळवारी तांत्रिक बिघाड झाल्याची घटना समोर आली. छत्रपती संभाजीनगर येथून लातूरकडे उड्डाण घेण्याच्या तयारीत असताना वैमानिकाच्या सतर्कतेमुळे हा बिघाड वेळेत लक्षात आल्याने मोठी दुर्घटना टळली. निवडणुकीच्या रणधुमाळीत नेत्यांच्या हवाई प्रवासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
तीन दिवसांपासून पंकजा मुंडे मराठवाड्यात जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचार दौऱ्यावर आहेत. सोमवारी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात प्रचार सभा घेतल्यानंतर मंगळवारी लातूर जिल्ह्यात विविध ठिकाणी त्यांच्या प्रचारसभा नियोजित होत्या. त्यासाठी त्या छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळावरून हेलिकॉप्टरने लातूरकडे रवाना होणार होत्या. मात्र हेलिकॉप्टर हवेत झेप घेण्यापूर्वीच तांत्रिक अडचण आढळून आल्याने सुरक्षेच्या कारणास्तव तत्काळ उड्डाण रद्द करण्यात आले. या घटनेमुळे लातूरमधील त्यांच्या नियोजित सभांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. कार्यकर्त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी तातडीने दुसऱ्या हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्यात आली.
हेलिकॉप्टरने प्रवास करत असल्याने आई देव पाण्यात ठेवते
सोमवारी बजाजनगर येथील प्रचार सभेत बोलताना पंकजा मुंडे यांनी, मी हेलिकॉप्टरने प्रवास करत असल्याने माझी आई देव पाण्यात ठेवते, असे विधान केले होते. त्यानंतर आज सकाळी त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड आढळून आला. लातूरमधील प्रचार सभेत बोलताना मुंडे यांनी या घटनेवर भावना व्यक्त केल्या. आज सकाळपासून माझी आई देव पाण्यात ठेवून बसली होती. आम्ही सतत हेलिकॉप्टरने प्रवास करतो, त्यामुळे कुटुंबीय काळजी करतात, असे त्या म्हणाल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, अनेक कार्यकर्त्यांनी विमान प्रवास टाळण्याच्या सूचना दिल्या होत्या. या घटनेमुळे हेलिकॉप्टरच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.




























































