
पश्चिम रेल्वे मार्गावर मध्य रेल्वेप्रमाणेच विस्कळीत वेळापत्रकाचे रडगाणे सुरू झाले आहे. बुधवारी सकाळी ‘पीक अवर्स’ला विरार ते चर्चगेटदरम्यान अनेक लोकल ट्रेन 15 ते 45 मिनिटे उशिराने धावल्या. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.
पश्चिम रेल्वेची सेवा मागील अनेक दिवसांपासून बोंबलली आहे. एसी लोकलची संख्या वाढवताना सामान्य लोकलच्या वेळापत्रकाकडे दुर्लक्ष झाले आहे. विरार ते चर्चगेट स्थानकांदरम्यान धावणाऱया गाडय़ा खचाखच भरलेल्या असतात. प्रवाशांना विरार लोकलच्या गेटवर लटकत जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. बुधवारी सकाळी चर्चगेटच्या दिशेने येणाऱया लोकल ट्रेन 10 ते 45 मिनिटांपर्यंत उशिराने धावल्या. विरार ते बोरिवलीपर्यंतचा प्रवास 37 मिनिटांचा असतो. या प्रवासात 45 मिनिटांच्या विलंबाचा मनस्ताप प्रवाशांनी सहन केला.
मध्य रेल्वेवर दररोज 50 हून अधिक फेऱ्या रद्द
मध्य रेल्वेवर दररोज 50 हून अधिक लोकल फेऱया रद्द केल्या जात आहेत. हे गंभीर वास्तव रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी मान्य करीत आहेत. रोज सकाळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून डाऊन दिशेला जाणाऱया तसेच संध्याकाळी अप दिशेने म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे येणाऱया लोकल रद्द कराव्या लागतात, असे एका वरिष्ठ अधिकाऱयाने सांगितले.


























































