
पश्चिम रेल्वे मार्गावरील उपनगरीय स्थानकांचा कायापालट करताना मराठी भाषेची गळचेपी केली जात आहे. रेल्वे स्थानकांमधील जुने इंडिकेटर्स हटवून त्या ठिकाणी बसवल्या जाणाऱ्या नवीन इंडिकेटर्सवरील मातृभाषेच्या अस्तित्वाला कात्री लावली गेली आहे. राज्यात ‘हिंदी सक्ती’ला तीव्र विरोध होत असतानाच पश्चिम रेल्वे मराठीच्या मुळावर उठल्याने संतापाची लाट उसळली आहे.
पश्चिम रेल्वे प्रशासनाने बहुतांश स्थानकांच्या अद्ययावतीकरणाच्या कामाला गती दिली आहे. चर्चगेटपासून ते मुंबई सेंट्रलपर्यंतच्या स्थानकांवर प्लॅटफॉर्मवरील शेड, वृद्ध आणि दिव्यांग प्रवाशांना उपयुक्त ठरणारे रॅम्प, नवीन इंडिकेटर्स, रंगरंगोटी अशी विविध कामे केली जात आहेत. या कामाचा दिखावा करताना रेल्वे प्रशासनाने मराठी भाषेचे अस्तित्व हळूहळू संपवण्याचा घाट घातल्याचे उघडकीस येत आहे. प्रमुख रेल्वे स्थानकांत ‘अमृत भारत’ योजने अंतर्गत स्मार्ट इंडिकेटर्स बसवण्यात आले आहेत. रेल्वे स्थानकांतील इंडिकेटर्सवर लोकल ट्रेन किती डब्यांची, गाडीची वेळ, गाडी प्लॅटफॉर्मवर येण्यास असलेली अपेक्षित मिनिटे असा तपशील असतो. हा तपशील मोठय़ा अक्षरांत इंग्रजीमध्ये असला तरी त्यावर ‘वेळ, गाडी, डबे, अपेक्षित मिनिटे’ हा उल्लेख मराठी भाषेत केला जात असे. स्मार्ट इंडिकेटर्समध्ये मराठी भाषेतील उल्लेख टाळून तेथे हिंदी आणि इंग्रजी भाषेचा वापर करण्यात येत आहे. हा टप्प्याटप्प्याने मराठी भाषा संपवण्याचा डाव असल्याची संतप्त प्रतिक्रिया मराठी भाषाप्रेमींनी व्यक्त केली आहे.
पश्चिम रेल्वे प्रशासनाचा वेळोवेळी मराठीद्वेष दिसला आहे. प्रशासनाने स्मार्ट इंडिकेटर्स बसवताना मराठी भाषेला डावलले असून मातृभाषेचा हा अपमान खपवून घेणार नाही. केंद्र सरकारच्या ‘त्रिभाषा सूत्र’ धोरणाची अंमलबजावणी करताना मराठी भाषेला प्राधान्य दिलेच पाहिजे. इंडिकेटर्सवर पूर्ववत मराठीचा वापर करावा, अन्यथा आम्ही उग्र आंदोलन करू.
z गोवर्धन देशमुख, अध्यक्ष, मराठी एकीकरण समिती





























































