
कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआयमुळे नोकऱया धोक्यात आल्या आहेत, अशी भीती सर्वच क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे. अनेक सेक्टरमध्येही एआयने आपले वर्चस्व निर्माण केल्याचेही दिसत आहे. एआयमुळे अनेक कामे ऑटोमेटिक होत आहेत. हजारो कर्मचाऱयांना नोकरी गमवण्याची भीती असताना आयबीएम या प्रसिद्ध आयटी कंपनीचे सीईओ अरविंद कृष्णा यांनी एआयचा धोका सांगितला आहे. एआयमुळे कॉल सेंटरमधील 50 टक्के कर्मचाऱयांच्या नोकऱया जातील, असे त्यांनी सांगितले. ब्लूमबर्गला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली. ज्या वेगाने एआय टेक्नोलॉजी ग्राहकांशी संवाद साधण्यात अधिक सक्षम होईल. त्याच वेगाने निम्म्याहून अधिक नोकऱया कर्मचाऱयांच्या गेलेल्या असतील. आयटी, एचआर हेल्पडेस्कवरील नोकऱयांनाही एआयचा सर्वात मोठा धोका आहे. या सर्व अशा नोकऱया आहेत. ज्यामध्ये पुनरावृत्ती होणारी कामे आणि ठराविक साचा आहे. एआय ही कामे सर्वात वेगाने करू शकते. त्यामुळेच अशा नोकऱयांना सर्वात जास्त धोका आहे. कागदपत्रांवरील आधारित कामे जसे, अकाउंट्स पेएबल, रिसिव्हिबलमधील नोंदी जुळवणे, ही कामे एआयमुळे पूर्णपणे नष्ट होऊ शकतात. कर्मचाऱयाला नोकरी टिकवायची असेल तर त्याला नवीन कौशल्ये शिकण्याची गरज आहे, असेही ते यावेळी म्हणाले.

























































