
हिंदुस्थानच्या महिला संघाचा सध्या ऑस्ट्रेलिया दौरा सुरू आहे. या दौऱ्यातील तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना आज (21 फेब्रुवारी 2026) अॅडलेडमध्ये खेळला गेला. दोन्ही संघांसाठी हा सामना मालिका विजयाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण होता. अटीतटीच्या झालेल्या य लढतीत टीम इंडियाने बाजी मारत ऑस्ट्रेलियाचा 17 धावांनी पराभव केला आणि मालिका जिंकली. या मालिका विजयासह टीम इंडियाची दहा वर्षांची टी20 मालिका विजयाची प्रतीक्षा संपुष्टात आली आहे.

अॅडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 6 गड्यांच्या मोबदल्यात 176 धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियाला जिंकण्यासाठी 177 धावांचे आव्हान दिले होते. स्मृती मानधनाने 55 चेंडूंमध्ये 8 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 82 धावांची खेळी केली. तर जेमिमाने 46 चेंडूंमध्ये 59 धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी अचूक मारा केल्यामुळे ऑस्ट्रेलियाला 20 षटकांमध्ये 159 धावांवर रोखण्यात यश आलं. श्री चरणी आणि श्रेयंका पाटील यांनी प्रत्येकी 3-3 विकेट घेतल्या. तर अरुंदती रेड्डीने 2 आणि रेणुका सिंग ठाकूरने 1 विकेट घेत संघाचा विजय निश्चित केला.

टीम इंडियाला मागील दहा वर्षांमध्ये एकदाही ऑस्ट्रेलियामध्ये टी20 मालिका विजयाचा आनंद साजरा करता आला नव्हता. मात्र, हा दुष्काळ आता हरमनप्रीतच्या नेतृत्वात टीम इंडियाने संपुष्टात आणला आहे. पहिला टी20 सामना जिंकल्यानंतर मालिकेत संघाने आघाडी घेतली होती. परंतू दुसऱ्या टी20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने कडवी झुंद देत टीम इंडियाचा पराभव केला आणि मालिका 1-1 अशी बरोबरती आणली. त्यामुळे तिसरा टी20 सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वपूर्ण होता. अखेर टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत मालिका विजयाचा आनंद साजरा केला.



























































