
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘न खाऊंगा न खाने दुंगा…’ या घोषणेला भाजपमधूनच हरताळ फासला आहे. सिंचन विभागातील काम मंजूर करून देण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे कर्नाटकच्या गडग जिह्यातील आमदार चंद्रू लामाणी यांना 5 लाख रुपयांची लाच घेताना लोकायुक्त पोलिसांनी रंगेहाथ पकडले. लोकायुक्त पोलिसांनी मोठय़ा शिताफीने सापळा रचून भाजप आमदाराला अटक केली. या घटनेमुळे देशभरात खळबळ उडाली आहे.
लामाणी हे गडग जिह्यातील शिरहट्टी मतदारसंघातील आमदार आहेत. लोकायुक्त पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लामाणी यांनी सिंचन विभागाचे काम मंजूर करून देण्यासाठी एका कंत्राटदाराकडून 11 लाख रुपयांची मागणी केली होती. या कंत्राटदाराने यासंदर्भात तक्रार दिल्यानंतर लोकायुक्त पोलिसांनी सापळा रचला. लाचेच्या रकमेपैकी पाच लाख रुपये घेताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. या कारवाईदरम्यान त्यांचे स्वीय सहाय्यक मंजुनाथ वाल्मीकी आणि गुरू नाईक यांनाही अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी आमदारासह तिघांविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असे लोकायुक्तांनी म्हटले आहे.
कशासाठी मागितली लाच?
क्लास-1 कंत्राटदार असलेल्या विजय पुजारी यांनी तक्रार दिली होती. ते गडग जिह्यातील चिंचली गावातील रहिवासी आहेत. रस्त्याच्या कडेला रिटेनिंग वॉल बनवण्याचे काम होते. त्याचे कंत्राट मिळवून देण्यासाठी लामाणी यांनी 11 लाख रुपयांची लाच मागितली होती. लामाणी यांच्या श्री बालाजी रुग्णालयात पाच लाख रुपयांची रक्कम घेण्याचे ठरले. त्यानंतर सापळा रचून लामाणी यांना पकडले.
भाजप कारवाई करणार का याकडे लक्ष
निवडणूक प्रचारात पंतप्रधान मोदी हे ‘ना खाऊंगा ना खाने दुंगा’ ही घोषणा आवर्जून देतात. भ्रष्टाचाराविरोधात झीरो टॉलरन्स ही आपल्या पक्षाची भूमिका आहे, असे सांगत असतात. त्यामुळे आता भाजप लाचखोर आमदार लामाणी यांच्यावर काय करवाई करणार, त्यांची पक्षातून हकालपट्टी करणार का, याकडे सर्वांचेलक्ष लागले आहे.





























































