
‘अजित पवार यांच्या विमान अपघाताशी व्हीएसआर कंपनीचा संबंध असल्याचा संशय असून केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री राममोहन नायडू या कंपनीला वाचवू पाहत आहे. त्यामुळे अपघाताची चौकशी पूर्ण होईपर्यंत नायडू यांचा राजीनामा घ्यावा,’ अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नायडू यांच्या संदर्भात पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिल्याचे त्यांनी सांगितले. ‘तेलुगू देसम पक्षाच्या सर्वोच्च नेत्याची कंपनी व्हीएसआर कंपनीला आर्थिक मदत करते. राममोहन नायडू हे याच पक्षाचे आहेत. अपघात झाल्यानंतर लगेचच त्यांनी या अपघाताशी विमान सुरक्षिततेचा संबंध नसल्याचा दावा केला होता. त्यांचे हे वर्तन संशय निर्माण करणारे आहे. ते मंत्रीपदावर राहिले तर या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होऊ शकणार नाही, असे रोहित पवार म्हणाले. ‘दादांच्या मृत्यूबद्दल महाराष्ट्रातील जनतेच्या मनात संशयाची भावना आहे. त्याची दखल पंतप्रधान मोदी व शहा यांनी घ्यावा, असे रोहित पवार म्हणाले.
प्राथमिक अहवाल 28 फेब्रुवारी रोजी
बारामती विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल 28 फेब्रुवारीला सार्वजनिक केला जाईल, अशी माहिती नागरी उड्डाण मंत्रालयाने आज केली.
ये रिश्ता क्या कहलाता है..?
‘राममोहन नायडू हैदराबादच्या ज्या ज्युबिली हिल्स परिसरात राहतात, त्याच परिसरात व्हीएसआर कंपनीचे प्रमुख व्ही. के. सिंग यांनीही घर घेतलेले आहे. ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ असा सवालही त्यांनी उपस्थित केला. आमच्या मनातील प्रश्न तुम्ही उपस्थित करत आहात, असे अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांनी आपल्याला सांगितले आहे, असा दावाही त्यांनी यावेळी केला.





























































