
गेल्या हंगामाच्या तुलनेत राज्यात यंदा साखर उत्पादनात सुमारे 20.86 लाख मेट्रिक टनाची वाढ दिसून येत आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाने कालपर्यंतचा ऊस गाळप अहवाल प्रसिद्ध केला आहे. चालू गाळप हंगामात (2025-26) राज्यातील 107 सहकारी आणि 103 खासगी असे एकूण 210 कारखाने सुरू झाले आहेत. गेल्या हंगामात याच कालावधीत 200 कारखाने सुरू होते.
राज्यातील विविध विभागांमध्ये कोल्हापूर आणि पुणे विभागाने आपली आघाडी कायम ठेवली आहे. कोल्हापूर विभागात सर्वाधिक 22.39 लाख मेट्रिक टन साखर उत्पादन झाले असून, साखर उतारा सर्वाधिक 10.93 टक्के आहे. पुणे विभागात 32 कारखान्यांच्या माध्यमातून 214.40 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण झाले आहे. सोलापूर विभागात सर्वाधिक 49 कारखाने सुरू झाले असून, 209.31 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप झाले आहे. नांदेड आणि अहिल्यानगर या विभागांनीही अनुक्रमे 111.63 आणि 121.19 लाख मेट्रिक टन ऊस गाळप झाले आहे.
यंदा राज्याची एकूण गाळप क्षमता 10 लाख 43 हजार 550 मेट्रिक टन असून, ती गेल्या वर्षाच्या तुलनेत 73 हजार 500 टनाने वाढली आहे. आतापर्यंत 35 कारखान्यांचे गाळप हंगाम संपले आहेत, तर गेल्या वर्षी ही संख्या 38 होती.
n एकूण ऊस गाळप ः 980.75 लाख मेट्रिक टन (गेल्या वर्षी 763.53 लाख मेट्रिक टन होते.)
n एकूण साखर उत्पादन ः 91.78 लाख मेट्रिक टन (गेल्या वर्षी 70.92 लाख मेट्रिक टन होते.)
n सरासरी साखर उतारा ः 9.38 टक्के (गेल्या वर्षी 9.29 टक्के होता.)


























































