
वन आच्छादन वाचविण्यासाठी कमीत कमी झाडे तुटतील, याची काळजी सर्वांनीच घेणे आवश्यक आहे. वनांमुळेच पक्षांचा अधिवास वाचू शकतो. पक्षी हे बीज प्रसारक असतात. निसर्गतः झाडे लावण्याची, वाढविण्याची, जगविण्याची प्रक्रिया निसर्ग आणि पक्षी करत असतात. देवराई सांभाळणे आपल्या सर्वांचे काम आहे. पक्षांचा अधिवास वाचविणे, हा अधिवास पुनर्संचयन करण्यासाठी सर्वांनी एकत्र येवून काम करणे गरजेचे आहे, असे आवाहन माजी प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनिल लिमये यांनी केले.
वन विभागामार्फत जिल्ह्यात प्रथमच जिल्हास्तरीय पक्षी मित्र संमेलन येथील हॉटेल कोहिनूर येथे झाले. या उद्घाटनप्रसंगी मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक संजय गांधी राष्ट्रीय उद्यान जितेंद्र रामगावकर, मुख्य वनसंरक्षक (प्रा.) कोल्हापूर जी. गुरुप्रसाद, मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प चांदोली तुषार चव्हाण, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कराडचे उपवन संरक्षक किरण जगताप, सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वनअधिकारी रणजीत गायकवाड, विभागीय वनअधिकारी गिरिजा देसाई, सहाय्यक वनसंरक्षक प्रियांका लगड, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते उपस्थित होते.
मार्गदर्शन करताना माजी प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनिल लिमये म्हणाले, सध्या सर्वजण म्हणतात झाडे लावली पाहिजेत, पक्षी वाचविले पाहिजेत, पक्ष्यांच्या जाती वाचविल्या पाहिजेत, हे काम केवळ शासकीय विभाग किंवा वन विभाग करु शकत नाही. यासाठी विविध संस्था, संघटना यांनी एकत्र येवून काम करणे आवश्यक आहे. रत्नागिरी जिल्ह्यात चांगली वनसंपदा आहे. जंगले आहेत. या जंगलांचे संरक्षण करणे, ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. काही जागा, माळराने, देवराई, पाणथळ जिथे खूप पक्षी येतात, या जागा कागदोपत्री वन म्हणून घोषित नाहीत. अशा जागा शोधाव्यात व त्या वन म्हणून घोषित करण्यासाठी सामुहिक प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सांगितले. पक्ष्यांचे, प्राण्यांचे आपल्या आयुष्याशी एक वेगळे नाते आहे. पक्षीमित्र, संशोधक, पक्षीप्रेमी, पक्षी संरक्षक आणि वन विभाग यांनी तळमळीने काम करणे आवश्यक आहे. पक्ष्यांच्या संरक्षणासाठी आणि त्यांचे अधिवास वाचविण्यासाठी जनजागृती करणे आवश्यक आहे. आजकाल सोशल मीडिया हे खूप मोठे प्रसारमाध्यम आहे. त्याच्याद्वारे याबाबत सर्वांना माहिती देणे आवश्यक आहे. या चळवळीच्या माध्यमातून दबाव गट तयार करणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.
मुख्य वनसंरक्षक कोल्हापूर जी. गुरुप्रसाद यांनी, पक्षी व प्राणी यांच्या संरक्षणासाठी त्यांना वाचविण्यासाठी सगळ्यांचे सहकार्य मिळणे आवश्यक असल्याचे सांगितले. चव्हाण म्हणाले, रत्नागिरी जिल्ह्यात पक्षी संमेलनाला सुरुवात झाली, ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे. येणाऱ्या काळासाठी या संमेलनाचे महत्त्व अधोरेखित होईल. देशात 1300 पक्षी आहेत, महाराष्ट्रात जवळपास 500 पक्षी आहेत. 220 पक्षी स्थलांतरित असतात. कोकणाचा पाठीराखा सह्याद्री आहे. या संमेलनाचा निश्चितच पक्षी अधिवास संवर्धनासाठी फायदा होईल.
रामगावकर म्हणाले, या संमेलनाच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी शिकता येणार आहेत. जिल्ह्यामध्ये पक्ष्यांच्या वेगळ्या प्रजाती आहेत. त्यांचे संवर्धन करणे हे आपल्या सर्वांचे काम आहे. आपल्या सर्वांचा त्यामध्ये मोठा वाटा राहणार आहे. कार्यक्रमाच्या प्रास्तविकात गिरीजा देसाई यांनी रत्नागिरी जिल्ह्याला 167 कि.मी.चा विस्तीर्ण समुद्र किनारा आणि सह्याद्रीच्या पर्वत रांगा आहेत. इथे प्राणी व पक्षी यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. जवळपास 350 पेक्षा जास्त पक्षांच्या जाती आढळतात. रत्नागिरी जिल्ह्याचे नाव निसर्ग पर्यटन तसेच पक्षी पर्यटन म्हणून जगाच्या नकाशावर आणण्यासाठी पक्षी प्रेमी, पक्षी तज्ञ, संशोधक यांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. याबाबत जनजागृती करण्यासाठी या पक्षीमित्र संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. पुढील संमेलन हे मोठ्या स्वरुपात घेतले जाईल. यामध्ये विद्यार्थ्यांचा समावेशही असेल, असेही त्यांनी सांगितले.

























































