पंतप्रधान मोदी यांच्या परराष्ट्र धोरणामुळे देशाला मोठी किंमत मोजावी लागत आहे, काँग्रेस नेते जयराम रमेश यांची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परराष्ट्र धोरणावर जोरदार टीका केली आहे. “स्वतःला ‘विश्वगुरू’ म्हणवणाऱ्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानचे परराष्ट्र धोरण उघडे पडले आहे,” असा आरोप त्यांनी केला.

अमेरिका–पाकिस्तान संबंधांवर प्रश्न

रमेश यांनी म्हटले की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानशी जवळीक कायम ठेवत आहेत. पहलगाम येथे 22 एप्रिल 2025 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भडकाऊ वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीचे कौतुक अमेरिकेकडून होत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच अफगाणिस्तानविरोधातील पाकिस्तानच्या कारवाईला अमेरिकेने पाठिंबा दिल्याचाही त्यांनी उल्लेख केला.

‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवण्याचा दावा

10 मे 2025 रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवण्यात अमेरिकेने हस्तक्षेप केल्याचा दावा ट्रम्प यांनी शंभर वेळा केल्याचे रमेश म्हणाले. वाढीव आयात शुल्काच्या धमकीचा वापर करून हा निर्णय घेतल्याचे ट्रम्प सांगत असल्याचे त्यांनी नमूद केले. मात्र या दाव्यांवर पंतप्रधान मोदी मौन बाळगत असल्याची टीकाही त्यांनी केली. ऑपरेशन स्थगितीची पहिली घोषणा अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी 10 मे 2025 रोजी सायंकाळी 5:37 वाजता केल्याचा दावा रमेश यांनी केला.

हिंदुस्थान–अमेरिका व्यापार करार

2 फेब्रुवारी 2026 रोजी ट्रम्प यांनी मोदींच्या विनंतीवरून हिंदुस्थान–अमेरिका व्यापार करार अंतिम झाल्याची घोषणा केली होती, असे रमेश म्हणाले. संसदेत राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांपासून लक्ष हटवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचा आरोप त्यांनी केला. त्यानंतर 18 दिवसांनी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने ट्रम्प यांच्या आयात शुल्क धोरणाला बेकायदेशीर ठरवले, असे त्यांनी नमूद केले.

एकतर्फी कराराचा आरोप

रमेश यांच्या मते, या व्यापार करारात हिंदुस्थानने विशेषतः कृषी आयातीवरील निर्बंध मोठ्या प्रमाणात सैल करण्याचे आश्वासन दिले आहे, मात्र अमेरिकेकडून भारतीय निर्यातीबाबत कोणतीही ठोस हमी देण्यात आलेली नाही. तसेच हिंदुस्थानने रशियाकडून तेल खरेदी थांबवण्यास मान्यता दिल्याचे अमेरिकेने वारंवार म्हटले असले, तरी मोदी सरकारने याबाबत स्पष्ट भूमिका मांडलेली नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

इस्रायल भेट आणि इराणवरील कारवाई

25–26 फेब्रुवारी 2026 रोजी मोदी यांनी इस्रायल दौरा केला, त्या वेळी अमेरिका–इस्त्रायल इराणवर लष्करी कारवाई करणार असल्याची चर्चा जगभर होती, असे रमेश म्हणाले. मोदी यांच्या इस्रायली संसदेतील (Knesset) भाषणावरही त्यांनी टीका केली. इराणवरील हल्ले आणि लक्ष्यित हत्या याबाबत मोदी सरकारची प्रतिक्रिया ही हिंदुस्थानच्या मूल्ये आणि तत्त्वांना धोका देणारी असल्याचा आरोप त्यांनी केला.

चीनबाबतचे विधान
19 जून 2020 रोजी मोदी यांनी चीनला सार्वजनिकरीत्या ‘क्लीन चिट’ दिल्याचा आरोप रमेश यांनी केला. लडाख सीमेवर 20 जवान शहीद झाल्यानंतर हे विधान केल्यामुळे हिंदुस्थानची वाटाघाटीची भूमिका कमकुवत झाली आणि आता चीनच्या अटींवर संबंध सामान्य करण्याची वेळ आली असल्याचे ते म्हणाले.

शेवटी, “मोदी यांच्या परराष्ट्र धोरणाच्या आशय आणि शैलीमुळे राष्ट्राला मोठी किंमत मोजावी लागत आहे,” असे जयराम रमेश यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले.