
स्थानिक गुन्हे शाखा, लातूर व पोलीस स्टेशन गातेगाव यांच्या संयुक्त पथकाने मुरूड-अकोला चौक परिसरात छापा टाकून गावठी पिस्टलसह परळी जि.बीड येथील तीन युवकांना ताब्यात घेतले आहे.
28 फेब्रुवारी 2026 रोजी पहाटे सुमारे 04.00 वाजण्याच्या सुमारास पोलीस स्टेशन गातेगाव येथील अधिकारी व कर्मचारी शासकीय वाहनाने हद्दीत नियमित नाईट पेट्रोलिंग करीत होते . मुरूड-अकोला चौक परिसरात काही संशयित इसम थांबले असून त्यांच्याकडे अवैध शस्त्र असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ हालचाल सुरू केली. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व गातेगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी यांनी संयुक्तरीत्या साखरा पाटी परिसरात एकत्र येत पुढील कारवाईचे नियोजन केले. पोलिसांनी मुरूड-अकोला चौक येथे पहाटे सुमारे 04.30 वा. सापळा रचून छापा टाकला. अजय गौतम लोमटे (वय 20 वर्षे, रा. फुलेनगर, परळी जि. बीड), नयन सुधाकर वाडे (वय 26 वर्षे, रा. गंगासागर नगर, परळी वैजनाथ, जि. बीड),सोमेश्वर सुभाष मिसाळ (वय 20 वर्षे, रा. फुलेनगर, परळी जि. बीड) यांच्या मुसक्या आवळल्या.
अजय गौतम लोमटे याची झडती घेतली असता त्याच्याकडून एक स्टीलची गावठी पिस्टल व मॅगझीन असा ₹30,000 किंमतीचा मुद्देमाल मिळून आला. तत्काळ पंचनामा करून सदर शस्त्र जप्त केले. शस्त्राचा कोणताही वैध परवाना नसल्याचे उघड झाले.त्यामुळे पोलीस स्टेशन गातेगाव येथे शस्त्र अधिनियम कलम 3/25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या शस्त्राचा वापर कोणत्या गुन्ह्यासाठी केला जाणार होता का याचाही तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.


























































