भाजपला निवडणुकीत पराभवाची भीती, म्हणूनच आप नेत्यांना तुरुंगात टाकलं; भगवंत मान यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी आम आदमी पक्षाच्या (AAP) नेत्यांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप करत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि मनीष सिसोदिया यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदींना केवळ आम आदमी पक्षाची भीती वाटते, म्हणूनच ते सूडबुद्धीने कारवाई करत आहेत,” असे वक्तव्य भगवंत मान यांनी केले आहे.

रविवारी जंतरमंतर येथे आयोजित रॅलीला व्हर्च्युअल पद्धतीने संबोधित करताना भगवंत मान यांनी म्हटले की, “पंतप्रधान मोदींना माहिती आहे की जर कोणी भाजपला रोखू शकतं, तर तो केवळ आम आदमी पक्ष आहे. अरविंद केजरीवाल यांची वाढती लोकप्रियता पाहून भाजप घाबरला आहे. मद्य घोटाळ्याचा बहाणा करून आमच्या नेत्यांना तुरुंगात टाकले जात आहे, पण जनता हे सर्व उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. हा केवळ आपला संपवण्याचा कट आहे.”

दीर्घकाळ तुरुंगात राहिल्यानंतर बाहेर आलेले मनीष सिसोदिया यांनीही भाजपच्या धोरणांवर टीका केली. ते म्हणाले, “आम्ही मुलांसाठी शाळा बांधल्या, गरिबांना आरोग्य सेवा दिली, हेच आमचे पाप ठरले आहे का? भाजपला शिक्षणाचे आणि विकासाचे राजकारण करायचे नाही, त्यांना केवळ सत्ता मिळवण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा वापर करायचा आहे. पण आम्ही घाबरणार नाही, आमचा लढा सुरूच राहील.”