T20 World Cup – संजूने मोडला विराटचा रेकॉर्ड, वेस्ट इंडिजचा धुव्वा उडवत टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टी-२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये हिंदुस्थानी संघाने ऐतिहासिक कामगिरी करत उपांत्य फेरीत (Semifinal) धडक मारली आहे. रविवारी कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर खेळल्या गेलेल्या अटीतटीच्या ‘करो वा मरो’ सामन्यात हिंदुस्थानने वेस्ट इंडिजचा ५ गडी राखून पराभव केला. या विजयाचा खरा शिल्पकार ठरला तो म्हणजे यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन, ज्याने आपल्या बॅटने कॅरेबियन गोलंदाजांची पळता भुई थोडी केली.

संजू सॅमसनची विक्रमी खेळी

वेस्ट इंडिजने दिलेल्या १९६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हिंदुस्थानची सुरुवात काहीशी डळमळीत झाली होती. मात्र, संजू सॅमसनने मैदानात येताच सामन्याचे चित्र पालटले. सॅमसनने अवघ्या ५० चेंडूंमध्ये ९७ धावांची नाबाद खेळी साकारली. या खेळीत त्याने १२ चौकार आणि ४ उत्तुंग षटकार ठोकले. या खेळीसह संजूने टी-२० वर्ल्ड कपमध्ये लक्ष्याचा पाठलाग करताना सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या उभारणारा हिंदुस्थानी खेळाडू होण्याचा मान मिळवला आणि विराट कोहलीचा जुना विक्रम मोडीत काढला.

प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने रोस्टन चेस (४०) आणि शिमरॉन हेटमायर (२७) यांच्या जोरावर आणि अखेरच्या षटकांत जेसन होल्डर व रोव्हमन पॉवेल यांच्या फटकेबाजीमुळे १९५ धावांचा डोंगर उभा केला होता. हिंदुस्थानकडून जसप्रीत बुमराहने महत्वपूर्ण विकेट्स घेतल्या. १९६ धावांचे लक्ष्य गाठताना हिंदुस्थानने आक्रमक पवित्रा घेतला. संजू सॅमसनला कर्णधार सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांची मोलाची साथ लाभली. हिंदुस्थानने ४ चेंडू राखून हे लक्ष्य गाठले आणि सेमीफायनलचे तिकीट निश्चित केले.

या विजयासह वेस्ट इंडिजचा स्पर्धेतील प्रवास संपला असून हिंदुस्थानी संघ आता उपांत्य फेरीत दाखल झाला आहे. हिंदुस्थानचा पुढचा सामना आता इंग्लंड विरुद्ध होणार आहे. हा हाय-व्होल्टेज सामना ५ मार्च रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाईल.