
चिपळूण रेल्वेस्थानकासमोर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अडीच लाख रुपयांचा गांजा जप्त केला. रेल्वेस्थानकासमोरील रस्त्यावर गस्त घालत असताना रिक्षा चालक आणि मोटरसायकलस्वार यांच्यात संशयास्पद हालचाली आढळून आल्याने पोलिसांनी त्यांची चौकशी केली. त्यांच्या सामानाची तपासणी केली असता 2 लाख 53 हजार 450 रुपये किंमतीचा 10 किलो 138 ग्रॅम गांजा सापडला. पोलिसांनी तिघांविरोधात चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी गांजासह रिक्षा आणि मोटारसायकल अशी दोन्ही वाहने मिळून 4 लाख 68 हजार 450 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी आकाश विजय जाधव (30), शिवकुमार भास्कर ठाकरे (48) आणि शंकर विनोद पारदे (31) यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी.बी.महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक नितीन ढेरे, उपनिरीक्षक प्रशांत बोरकर, सुभाष भागणे, दीपराज पाटील, शांताराम झोरे आणि प्रवीण होवाळ यांनी केली.




























































