पुणे बाजार समितीत माणुसकीचा बळी! रक्त येईपर्यंत मारहाण; 12 तास गुन्हा नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माणुसकीचाच बळी घेतला जात असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. राजस्थानातील जोधपूर येथून गाजर विक्रीसाठी आलेल्या वाहनचालकाला रात्री दोनच्या सुमारास बाजारात रक्त येईपर्यंत मारहाण करण्यात आली. मारहाणीनंतर त्याने सुरक्षा रक्षकांकडे मदतीची याचना केली; मात्र आम्ही काही करू शकत नाही, असे सांगत त्याला वाऱ्यावर सोडण्यात आले. तब्बल 12 तासांनंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली, यामुळे बाजार समिती प्रशासन आणि सुरक्षा व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे स्पष्ट झाले आहे.

पद्माराम सारंग (रा. जोधपूर, राजस्थान) हे गाजर घेऊन बुधवारी रात्री बाजारात दाखल झाले होते. रात्री दोन वाजता वाहनात जेवण करत असताना एका व्यक्तीला लघुशंका करू नका, अशी विनंती केल्याने वाद निर्माण झाला. संबंधिताने आणखी दोन-तीन जणांना बोलावून सारंग यांना बेदम मारहाण केली. त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी व सात-आठ हजार रुपये लंपास करण्यात आले. हा सर्व प्रकार सुरक्षा रक्षकांसमोर घडूनही त्यांनी हस्तक्षेप केला नाही, असा आरोप सारंग यांनी केला आहे. समितीच्या दोन विभागांतील टोलवाटोलवीत तक्रारीकडे सुरुवातीला दुर्लक्ष झाले. आडत्यांनी पाठपुरावा केल्यानंतरच मार्केट यार्ड पोलिसांत तक्रार देण्यात आली. मात्र, पोलिस तक्रारीतून पैसे व सोनसाखळीचा उल्लेख वगळण्यात आला. उलट पैसे गेले तर तू काय झोपला होतास का? अशा उलटसुलट प्रश्नांनी तक्रारदाराला हैराण केले गेले.

याबाबत मार्केटयार्ड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित कदम यांनी तक्रार देण्यासाठी व्यक्ती आली होती; मात्र बाजार समितीच्या सुरक्षा रक्षकांना चोरीबाबत सांगितले नव्हते, असे सांगितले. मात्र पोलिसांच्या वागणुकीवर त्यांनी बोलणे टाळले.

अधिकाऱ्यांकडून टोलवाटोलवी

बाजारातील दोन विभाग प्रमुखांमध्ये हद्दीचा वाद आणि जबाबदारीची टोलवाटोलवी सुरू असल्याचेही उघड झाले आहे. फळे-भाजीपाला विभाग प्रमुखांनी सुरक्षा विभागाकडे बोट दाखवले, तर सुरक्षा विभागाकडून वाहनचालक आमच्यापर्यंत आला नाही, असा दावा करण्यात आला. या सगळ्या प्रकारात जखमी वाहनचालक मात्र न्यायासाठी दरवाजे ठोठावत फिरत राहिला.

संबंधित सुरक्षा रक्षक कंपनीला नोटीस देण्यात येईल. तसेच हालगर्जी प्रकरणी कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे पुणे बाजार समितीचे सचिव डॉ. राजाराम धोंडकर यांनी सांगितले.